लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- मालाड पश्चिम मढ गांव परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या चावणाऱ्या श्वानांची (कुत्र्यांची) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर कुत्रे लहान मुलांना चावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून सदर त्रासामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेच्या परिसरात राहणारी कुमारी राजवी दत्ता कोळी वय ७ वर्षे हिला एका कुत्र्याने चावले तिला मोठी दुखापत झाली. तसेच किना-यावर एका लहान मुलाच्या मागे १० कुत्रे धावले तिथे येथील जॉनी जांभले व इतर नागरीक असल्यांने त्या मुलाला वाचवू शकले.तर काल दि २७ में रोजी आणखीन लहान मुलाला कुत्रा चावला.
हे प्रकार वाढत असल्याने पालिका प्रशासनाने वेळीच सदर भटके कुत्रे पकडण्यासाठी आपल्या विभागातील अधिका-यांना सुचित करून सदर भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मच्छिमार काँग्रेसचे सचिव संतोष कोळी यांनी पालिकेच्या पी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.आणि निवेदन स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.