Join us

मुंबईकरांनो, तुम्ही लटकूनच प्रवास करा !प्रवासी संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:49 AM

रेल्वे प्रशासनाने या मागण्यांना केराची टोपली दाखविली आहे.

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी लोकलमधील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करा, अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवा. ज्या स्थानकांवर गर्दी होते; त्या स्थानकांवर सुरक्षाव्यवस्था वाढवा, अशा अनेक मागण्या प्रवासी संघटनांनी केल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने या मागण्यांना केराची टोपली दाखविली असून, ठाणे, दिवा, बदलापूरसारख्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवरील वाढीव सुरक्षा व्यवस्थेची जबाबदार आरपीएफची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोट मोडत वाढत्या अपघातांवर संताप व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील विविध विषयांवर फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघाने प्रशासनाकडे विविध मुद्दे मांडले. मात्र या सगळ्या मुद्द्यांवर विविध कामे सुरू असल्याचे म्हणत रेल्वेने कोणत्याच प्रश्नाला ठोस उत्तरे दिलेली नाहीत.  रेल्वेने संघाला दिलेल्या उत्तरानुसार, कुर्ला-सीएसएमटीदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. कर्जत-पनवेल कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर कर्जत-पनवेल सेवेचा आढवा घेतला जाईल. पीक अवरमध्ये लोकलची गर्दी कमी करण्यासाठी ऑफिसच्या वेळेत बदल केले जात आहेत. त्यासाठी आवाहन केले आहे. कर्जत, कसारा लाइनवर ५० ते ४४ रेल ओव्हर ब्रीजचे काम प्रगतिपथावर असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

‘गुरुवली स्टेशन द्या’-

टिटवाळा आणि खडवली या दोन रेल्वेस्थानकांवर मोठी गर्दी होते. या परिसरातील रेल्वे प्रवाशांची सातत्याने गैरसोय होते. त्यांच्यासाठी टिटवाळा आणि खडवलीदरम्यान गुरवली या स्थानकाची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

गुरुवली स्टेशन बांधले पाहिजे. कारण खडवली, टिटवाळा पर्यटनस्थळे होत आहेत. गर्दी वाढत आहे. दररोजच्या प्रवाशांव्यतिरिक्त पर्यटकांची गर्दी वाढते आहे. फलाटांवरील गर्दी वाढते आहे. गुरुवली स्टेशन झाले तर गर्दीचे व्यवस्थापन करता येईल. मात्र प्रशासन यास नकार देत असल्याने प्रवाशांसमोरील अडचणी वाढत आहेत.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेरेल्वे प्रवासी