Join us  

बिंबीसारनगरचा व्यवस्थापन कर रद्द

By admin | Published: April 17, 2016 2:07 AM

गोरेगाव पश्चिमेकडील बिंबीसारनगर संकुलास भरावा लागणार सुमारे ४ कोटी रुपयांचा व्यवस्थापन कर अखेर रद्द करण्यात आला आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासोबत

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील बिंबीसारनगर संकुलास भरावा लागणार सुमारे ४ कोटी रुपयांचा व्यवस्थापन कर अखेर रद्द करण्यात आला आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आली आहे. मागील दशकाभरापासून संबंधितांना हा व्यवस्थापन कर भरावा लागत होता.बिंबीसारनगर वसाहतीत एकूण ११ सोसायट्या आहेत. यात सुमारे १ हजार ३५३ सदनिका आहेत. सोसायट्या रजिस्टर होत नाहीत, तोपर्यंत येथील कामांची देखभाल म्हाडातर्फे करण्यात येत होती. २००४ साली येथील ११ सोसायट्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. सोसायट्या रजिस्टर झाल्यानंतर येथील देखभालीचे काम सोसायट्यांमार्फत करण्यात येत होते. तसे पत्रही म्हाडाने सोसायट्यांना पाठवले होते. ज्या दिवसापासून सोसायट्यांनी देखभालीचे काम हाती घेतले, तेव्हापासून म्हाडाकडून व्यवस्थापन कर रद्द होणे अपेक्षित होते, परंतु याबाबत म्हाडाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यवस्थापन कर आकारणी बंद करण्याबाबत काहीच हालचाली होत नव्हत्या.या संदर्भात रवींद्र वायकर यांनी बैठक बोलावली. या बैठकीनंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापन आकार १ एप्रिल २००५पासून रद्द केल्याचे पत्र जारी केले. या निर्णयामुळे प्रत्येक सदनिकाधारकाचा अभिहस्तांतरणाचा मार्गही सुकर झाला आहे. (प्रतिनिधी)