मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर अदानींच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:22+5:302021-07-14T04:09:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अखेर मंगळवारी अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. ...

The management of Mumbai Airport is finally in the hands of Adani | मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर अदानींच्या ताब्यात

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर अदानींच्या ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अखेर मंगळवारी अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली.

केंद्र-राज्य सरकार आणि सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरित होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे.

‘जागतिक कीर्तीच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेताना आम्हाला अत्यानंद होत आहे. मुंबईकरांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी भविष्यात आम्ही करून दाखवू. प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरणाचे भान राखून कामकाज केले जाईल. स्थानिकांसाठी मोठ्या रोजगार संधी निर्माण केल्या जातील,’ अशा आशयाचे ट्विट अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केले.

‘जीव्हीके समूह’ गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. अदानी समूहाने ही संधी साधत त्यांच्या ताब्यातील मुंबई विमानतळ खरेदी करण्याच्या हालचाली २०१९मध्ये सुरू केल्या. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीत जीव्हीके समूहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’ यांची भागीदारी १० टक्के होती. फेब्रुवारी २०२१मध्ये अदानी समूहाने २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला. आता जीव्हीके समूहाकडील ५०.५० टक्के हिस्सा ताब्यात आल्याने अदानी समूह एकूण ७४ टक्क्यांचा भागीदार होईल. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना २ मार्च २००६ रोजी करण्यात आली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, निर्मिती आणि परिचालनाचे काम करते. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही अदानी एन्टरप्राइजेसची उपकंपनी त्यांच्या अखत्यारीतील विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. गेल्यावर्षी मंगळुरू, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाच्या ताब्यात आले होते.

Web Title: The management of Mumbai Airport is finally in the hands of Adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.