Join us

नियोजनशून्य कारभार! कोकण रेल्वेच्या गाड्या ६ तास उशिराने; गणेशभक्तांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 5:57 AM

कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सदर विलंब ब्लॉकमुळे असून त्याबद्दल आधी माहिती जाहीर केलेली असल्याचे सांगितले

मुंबई : अवघ्या काही तासांवर गणरायाचे आगमन आले. गणेशोत्सव कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपूर्वी चाकरमानी रेल्वेचे तिकीट आरक्षित करतात, पण त्या दृष्टीने योग्य नियोजन केले जात नाही, कोकण रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभाराचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. 

रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध एका प्रवाशाने सांगितले की,  कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व ट्रेन ५ ते ६ तास उशिराने धावत आहेत. वारंवार मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेस मिरज मार्गे वळवल्या जात नाहीत आणि मालगाड्या सुरू ठेवल्या जात आहेत. परिणामी चाकरमान्यांना १८ तास प्रवास करावा लागतो, आता दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ४० मिनिटे  विलवडे स्थानकात आणि  मांडवीला, वेरवलीला थांबवली होती. त्यामुळे लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमान्यांनी ३०० रु.चे तिकीट काढून मुंबईतून यायचे आणि स्टेशनला उतरल्यावर १ हजार रुपये रिक्षाचालकाला देऊन घरी जायचे, असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सदर विलंब ब्लॉकमुळे  असून त्याबद्दल आधी माहिती जाहीर केलेली असल्याचे सांगितले तसेच हा विलंब तासाभराचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :कोकण रेल्वेगणेशोत्सव