व्यवस्थापकाने कंपनीला लावला ४६ लाखांचा चुना!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:01 AM2019-05-09T03:01:19+5:302019-05-09T03:01:31+5:30
अंधेरीतील एका टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आस्थापनाला त्यांच्याच व्यवस्थापकाने ४६ लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. आस्थापनाच्या मालकाने हा आरोप केला असून, ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : अंधेरीतील एका टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आस्थापनाला त्यांच्याच व्यवस्थापकाने ४६ लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. आस्थापनाच्या मालकाने हा आरोप केला असून, ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संतोषकुमार केदारनाथ तिवारी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. अंधेरीतील लोखंवाला परिसरात असलेल्या कॉसमॉस टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या आस्थापनात तो २००३ साली रुजू झाला. त्याची कामातील प्रगती पाहून मालक सुरेंद्रसिंग यादव आणि त्यांची पत्नी सुरेश यांनी त्याला २०१५ मध्ये व्यवस्थापकपदी बढती दिली.
दरम्यान, यादव यांच्या पत्नीला आजार जडावल्यामुळे ते त्यांना घेऊन दिल्लीला गेले. त्यामुळे त्यांचे कामावरील लक्ष कमी झाले. त्याचाच फायदा घेत तिवारीने पैशांचा अपहार करण्यास सुरुवात केली. एका कंपनीकडून ६६ लाखांची थकबाकी असल्याचे यादव यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तिवारीला याबाबत विचारले. मात्र ती कंपनी पैसे देईल, असे त्याने यादव यांना सांगितले.
कंपनीच्या आॅडिटमध्ये ४६ लाख ४६ हजार ९६१ रुपयांची रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना समजले. मात्र, आॅडिटपूर्वी तिवारीने संगणकातील महत्त्वाचा मजकूर काढून टाकत नोकरी सोडली होती. कालांतराने विमान तिकीट बुकिंग संदर्भात यादव यांना तक्रारी येऊ लागल्या. तसेच तिवारीने यादव यांच्या खोट्या सह्या केल्याचेदेखील उघड झाले.
अॅडव्हान्स बुकिंगच्या नावाने उकळले पैसे!
तिवारी याने यादव यांच्या अडचणीचा फायदा घेत
सहा महिने आधीपासूनच
विमान तिकीट बुक
करण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेतले. मात्र, त्यांना कोणतेही तिकीट अथवा पॅकेज दिले नाही.
च्अशा प्रकारची कार्यपद्धती वापरत त्याने कंपनीला लाखो रुपयांचा चुना लावल्याचे यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जवळपास २५ ते ३० ग्राहकांना ४० टक्के सूट देण्याचे आमिष दाखवत तिवारीने त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.