मुंबई : राज्य सरकारने गेल्यावर्षी खरेदी केलेल्या तुरीवरील प्रक्रियेच्या कामात कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप होत असताना आज या प्रकरणी राज्य सहकारी पणन महासंघाचे महाव्यवस्थापक अनिल देशमुख यांना राज्य शासनाने निलंबित केले.तुरीपासून तूर डाळ तयार करण्याच्या कंत्राटदारांना दिलेल्या कामात हे घोटाळे झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. राज्य शासनाने गेल्यावर्षी ५ हजार ५० रुपये क्विंटल या दराने २५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली होती. बाजारात तुरीला मागणी नसल्याने ती रेशन दुकानांमधून देण्याचे राज्य शासनाने ठरविले आणि त्यामुळे खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून तूर डाळ तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये त्यासाठीच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. विशिष्ट मिलमालकांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने निविदा काढण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले.तुरीच्या घसाऱ्याचे प्रमाण ३० टक्के असावे असे मानक असताना प्रत्यक्षात ते प्रमाण ३३ ते ३५ टक्के इतके करण्यात आले. तुरीच्या संपूर्ण साठ्यावर प्रक्रिया करण्याची निविदा काढण्याची गरज नव्हती.>महाव्यवस्थापक अनिल देशमुख यांना निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.- योगेश म्हसे, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक.
पणन महासंघाचे सरव्यवस्थापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:14 AM