Join us  

बोगस पतपेढीचा चालक अटकेत; मालाड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 2:43 PM

सूत्रांच्या म्हणण्यानुसार यात साधारणपणे चार हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

 

मुंबई : बोगस सहकारी पतपेढी काढून छोटे-छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना गुंतवणुकीतून ६ वर्षांत दाम दुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारा बोगस पतपेढी संस्थाचालक रामसिंग चौधरी याला मालाड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यात साधारणपणे चार हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साईलीला या पतसंस्थेचे शिक्के व लेटरहेड वापरून आरोपीने ‘प्रतिज्ञा’ ही बोगस पतसंस्था तयार केली होती. ही पतसंस्था रस्त्यावरील फेरीवाले आणि छोट्या-छोट्या व्यावसायिकांना गुंतवणूक करून सहा वर्षांत दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे आश्वासन द्यायची. त्याशिवाय ‘लाडली योजना’ आणि इतर योजनांच्या माध्यमातूनही मुलींच्या वडिलांना अडीचपट लाभ व प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होती. मात्र, मुदत संपून गेल्यानंतरही चौधरीने गुंतवणूकदारांना पैसे परत दिले नाहीत. यासंदर्भात मालाड पोलिस ठाण्यामध्ये  पाच जणांनी तक्रार दिली होती. तेव्हा भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६, ४२० व ३४ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला. मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिग्विजय पाटील, हवालदार मुजावर शेख यांनी तपास केला. आरोपी  चौधरीने लॉकडाउनच्या काळात गरीब जनतेने जमा केलेली रक्कम बँकेत जमा केल्याचे उघड झाले. 

बँकेतील रकमेचा कर्ज म्हणून वापरबँकेत जमा रकमेचा कर्ज म्हणून वापर करून तो अधिक नफा आणि व्याज कमावत होता; परंतु मुदत पूर्ण होऊनही ज्यांचे पैसे क्रेडिट सोसायटीमध्ये जमा होते त्यांना तो पैसे परत करत नव्हता. एवढेच नव्हे तर आपल्या तारणाचे नुकसान केल्याने सहकारी पतसंस्था बंद झाल्याचे आरोपीने लोकांना सांगितले. मात्र, त्याच वेळी आरोपी रामसिंग हा गोरेगाव येथेच ‘साबेरा’ ही दुसरी पतसंस्था उघडून फसवणुकीचा धंदा चालवत होता. मालाड पोलिसांनी तपास करत आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. तपासात आरोपी रामसिंग आणि त्याच्या अन्य आठ साथीदारांनी मिळून अशा बोगस पतसंस्था तयार करून लोकांच्या रोजच्या बचतीतून लाखोंची रक्कम गोळा केली हे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी मालाड पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस