Join us

मनाचा गेट वे आॅफ इंडिया...

By admin | Published: February 07, 2016 2:16 AM

काही वर्षांपूर्वी एक बातमी खूप मोठी झाली असं म्हणण्यापेक्षा मोठीच गोष्ट घडली. २६/११ गेट वे आॅफ इंडियामधून आलेल्या काही अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. दरवर्षी वाढदिवस येतो

(महिन्याचे मानकरी)

- अंबर विनोद हडपकाही वर्षांपूर्वी एक बातमी खूप मोठी झाली असं म्हणण्यापेक्षा मोठीच गोष्ट घडली. २६/११ गेट वे आॅफ इंडियामधून आलेल्या काही अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. दरवर्षी वाढदिवस येतो आणि माणूस फक्त जीवंत आहे इतकंच न कळता त्याची वाढ होत आहे हे वाढदिवस सांगतो. तसंच जगभरात अतिरेक्यांनी केलेले हल्ले म्हणजे अशा अतिरेकी संघटनांचा वाढदिवस साजरा होतोय असं म्हणायला हरकत नाही.मी या सगळ्याला कारणीभूत गेट वे आॅफ इंडिया आहे असं म्हणेन. तुम्ही म्हणाल हा कसला आरोप ‘एका वास्तूला हा का नाव ठेवतोय?’ तर मी नाव वास्तूला ठेवत नाहीये. मी नाव जगातल्या माणूस नावाच्या अमानुष प्राण्याच्या मनाच्या दाराला नाव ठेवतोय. हो, आपल्या प्रत्येकाच्या मनाचं दार ‘गेट वे आॅफ इंडिया!’एक असा दरवाजा ज्याला उंबरठा नाही आणि दरवाजे नाहीत. म्हणूनच आपल्या मनात कोणीही कसलाही विचार विना व्हिजा विना पासपोर्ट घुसवू शकतं आणि हवा तेवढा आतंकवाद माजवू शकतं. बघा ना, म्हणजे जगात घडणारी कुठलीही बरी किंवा वाईट गोष्ट आपण कितीवेळा पडताळून मग ती मेंदू नावाच्या कॉम्प्युटरकडे विचार करायला पाठवतो, ह्याचा तरी विचार करून बघा. नाही विचार करत आपण, आज इसिस नावाची नवी-कोरी दहशतवादी संघटना आपलं मार्केटिंग जीव घेत करत सुटली आहे. सातासमुद्रापार असलेले हे मूठभर लोक आपल्या घरातल्या तरुणांच्या मनात काय चाललंय याचा विचार करून, त्यांना काय हवं, काय नको हे ठरवून त्यांना ‘हवं ते’ आॅफर करून आपल्या घरातून आतंकवाद मॅनेज करतात. आपल्याला हे माहीतही नसतं, कारण तरुणांच्या मनातल्या कुठल्या ना कुठल्या असंतोषाला खतपाणी घालायला हे तयार असतात. हे खतपाणी त्यांच्या मनाच्या गेट वे आॅफ इंडियातून येऊन घातलं जातंय. कारण ह्या गेटवे आॅफ इंडियावरच्या गोष्टी आपण फेसबूकवर टाकू शकतो. पण याच गेटच्या दुसऱ्या बाजूने कोण आत शिरतंय हे बघायला मनाला लागेल असा सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याकडे नाही.‘अतिथी देवो भव’ असं म्हणून आपला देश जगभरातून कुठल्याही माणसाला येऊ देतो, राहू देतो. तेच आपल्या मनाचं आहे. जगातला कुठलाही वाईट विचार आपण सहज येऊ देतो. त्याला आपण विचार करत जोपासतो आणि मग कधी अटॅक म्हणून नाहीतर, डिफेंस म्हणून आपणसुद्धा मुद्द्यांनी किंवा गुद्द्यांनी हल्ला करतो. पण ह्याला मात्र आपण आतंकवाद म्हणत नाही. सीमेवरचा आतंकवाद अजून सीमेवरच आहे. फक्त सीमेची जागा बदलत चालली आहे. ती देश, राज्य, जिल्हा, नगर, वस्तीपासून थेट घरापर्यंत आलीय. मग आतंकवादसुद्धा फक्त सीमेवर कसा राहील? मी तर साधी शिवीसुद्धा आतंकवाद म्हणेन. धक्काबुक्कीसुद्धा आतंकवाद म्हणेन. कोणाच्या अपरोक्ष केलेलं गॉसीपसुद्धा आतंकवादच म्हणेन. आतंकवादाचा चेहरा आणि रंग बदलतोय, तोसुद्धा व्हाइटकॉलर होतोय. स्पर्धा जशी वाढायला लागलीय तसे आपण स्वत:चा विचार करायला लागलो. पुढे जाण्यासाठी कोणालातरी मागे ढकलायला लागलो. मग ह्याला आपण काय म्हणणार, माणुसकी?हा लेख म्हणजे जगात चाललेल्या आतंकवादाचं समर्थन नाही; तर आधी आपल्या मनाच्या गेट वे आॅफ इंडियाला दरवाजे लावा नाहीतर, त्यावर विचारांचे सीसीटीव्ही लावा असं सांगणं आहे. येणारी बातमी अफवा आहे की खरी माहिती हे जाणून घेणं आवश्यक आहे.घराघरातल्या तरुणांनी असंतोषानं इसिससारखी संघटना जॉईन करणं ही गोष्ट आत्ता सरदी-पडशासारखी आहे तोवर त्याचा इलाज करणं गरजेचं आहे. एकदा का त्याचा कॅन्सर झाला की मग इलाजसुद्धा महाग होऊन बसेल. जगाकडे बघून आपण इतकं तरी नक्कीच शिकू शकतो. आत्ताच जागे होऊ शकतो. आत्ताच मनात शिरलेल्या वाईट विचारांना हद्दपार करू शकतो. नाहीतर प्रत्येक मनात एक इसिस तयार व्हायला वेळ लागणार नाही. मनाचा गेट वे आॅफ इंडिया हे एक प्रेक्षणीय स्थळ कधीच होऊ शकणार नाही. इतरांसाठी आणि स्वत:साठीसुद्धा.

(फेब्रुवारी महिन्याचे मानकरी असलेले अंबर हडप हे ‘बालक-पालक’, ‘यलो’, ‘बाळकडू’, ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटांचे आणि ‘असंभव’, ‘फू बाई फू’, ‘का रे दुरावा’, ‘आंबट गोड’ आणि ‘सारेगमप’ अशा मालिकांचे लेखक आहेत.)