मंडपेश्वर गुंफेला मिळाला नवा साज; शिवमंदिरात १२ किलो शिवलिंगाची करण्यात येणार स्थापना
By मनोहर कुंभेजकर | Published: March 4, 2024 04:55 PM2024-03-04T16:55:47+5:302024-03-04T16:56:54+5:30
तीन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : मुंबई-महाराष्ट्र राजपत्र १९०९ - १९१० नुसार मंडपेश्वर गुंफेचा इतिहास इ.स.८ व्या शतकापासून आहे.येथील गर्भगृहात शिवलिंग, गणेशाची मूर्ती आणि डाव्या बाजूला, तांडव नृत्य करत असलेले शिव आणि भिंतीवर कोरलेल्या इतर सुंदर हिंदू मूर्ती दिसतात. दुर्लक्षित असलेली ही प्राचीन आणि गुहा सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी आपल्या ताब्यात घेतली आणि तेथे पुन्हा पूजा सुरू झाली.सार्वजनिक पूजा सुरू झाल्यानंतर मंडपेश्वर गुंफेच्या हितासाठी मंडपेश्वर उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आणि महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा हे सण समितीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या थाटामाटात साजरे केले जाऊ लागले. मंडपेश्वर गुंफेच्या सुशोभिकरणानंतर प्रथमच अनेक नवनवीन उपक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सुमारे १५०० वर्षे जुने असलेल्या बोरिवली पश्चिम येथील मंडपेश्वर गुंफेला नवा लूक देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. खासदार शेट्टी यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्या सहकार्याने येथील गुंफेचे सुशोभिकरण करण्यात आले असून तीन दिवसीय मंडपेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडपेश्वर गुंफा शिवमंदिराचे सुशोभीकरण झाले असून येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आगामी काळात मंडपेश्वर लेणी शिवमंदिरासह एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊन भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनेल असा विश्वास खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त येत्या दि, ८ मार्च रोजी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अँड.आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आणि उत्तर मुंबईतील सर्व आमदारांच्या उपस्थितीत १२ किलो चांदीच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. मंडपेश्वर उत्सव समितीचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
येथील तीन दिवसीय कार्यक्रमात बुधवार दि, ६ मार्चपासून अखंड रामायण पाठाचे वांचन श्री अनिरुद्ध तिवारी यांच्या द्वारे होणार आहे. तर गुरुवार दि, ७ मार्च रोजी हवन तसेच प्रीती सिंग यांचा शिवचर्चा कार्यक्रम व सायंकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवार दि,८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त लघु रुद्र पूजन होईल आणि संध्याकाळी श्री गणपत बुवा पाटील यांचे भजन संध्या, तसेच सायंकाळी ६ वाजल्यानंतर केरळ तिरुवथिरकली पारंपारिक नृत्य अनेक मान्यवर कलाकार सादर करणार आहे.
मंडपेश्वर गुंफा शिवमंदिराचे सुशोभीकरण झाले असून येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आगामी काळात मंडपेश्वर गुंफा येथील शिवमंदिरासह एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊन भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनेल असा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.