ठाणे : जिल्ह्यात अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या दोन नगर परिषदांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-४ च्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स, फलक लावण्यासह झेंडे लावण्यास पोलिसांनी प्रतिबंध करून मनाई आदेश जारी केला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ-४, उल्हासनगरअंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व व बदलापूर पश्चिम या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रांत या निवडणुकीच्या दृष्टीने मनाई आदेश जारी केला आहे. यामुळे जनजीवन सुरळीत राहण्यासह सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक संपेपर्यंत बॅनर्स, पोस्टर्सना मनाई करण्यात आली आहे. निवडणुकीस अनुसरून राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना इमारतींना बॅनर्स, पोस्टर्स लावायचे असल्याने प्रथम संबंधित इमारतीच्या मालकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. यानंतर पोलीस स्टेशनमधून ना-हरकत दाखला मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा मनाई आदेश २३ एप्रिलच्या २४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी मनाई आदेश
By admin | Published: March 28, 2015 1:48 AM