Join us

काही जिल्हात संचारबंदी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यामुळे त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना हजेरी न देता त्यांच्याकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यामुळे त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना हजेरी न देता त्यांच्याकडून सक्तीने रजा महामंडळाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असून, संचारबंदी असलेल्या जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन हजेरी देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

गेल्या महिन्यापासून राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी जाहीर केली आहे. अशा ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाकडून कमी प्रमाणात एसटीच्या फेऱ्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे चालक, वाहकांना सदर कालावधीत कामगिरी मिळत नाही अशा कामगारांना हजेरी देणे आवश्यक आहे. तसेच सन २०१२-२०१६च्या कामगार करारातील कलम क्रमांक ५५ अन्वये संचारबंदी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी प्रशासनाने प्रवाशी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशावेळी चालक, वाहकांना त्या दिवसाची हजेरी देण्याचे मान्य केलेले आहे. सदर तरतुदीची अशा प्रसंगी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, अकोला, अमरावती, यवतमाळ व वर्धा विभागात कर्मचाऱ्यांना हजेरी न देता त्यांच्याकडून सक्तीने रजा घेतलेली आहे. हा प्रकार नियमबाह्य असून, कामगार कराराच्या तरतुदीचा भंग करणारे आहे. त्यामुळे कामगार कराराची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन हजेरी देण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून करण्यात आलेली आहे.

कर्मचाऱ्याच्या खात्यावरील रजा कापू नयेत

कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून एसटी कर्मचारी सेवा देत आहेत. कोरोनाने अनेक सहकारी बाधित झाले, तर शंभरापेक्षा अधिक सहकाऱ्यांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला. कोरोनाकाळात ज्या आस्थापना बंद राहतील अशा कामगारांना लॉकडाऊन प्रेझेंटी नियमानुसार मिळायलाच हवी तर २०१२-१६च्या वेतन करारातील कलम ५५नुसार संचारबंदी, नैसर्गिक आपत्ती काळात जर वाहतूक बंद असेल तर त्या दिवसाची हजेरी मिळावी अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याच्या खात्यावरील रजा कापू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.