मुंबई :
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील सर्व रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती करण्याचा निर्णय आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. रुग्णालयांमधील कर्मचारी, रुग्ण आणि अभ्यागतांना मास्कची सक्ती लागू असेल.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सोमवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी कोरोना नियंत्रणासाठी विविध सूचना जारी केल्या. त्यात ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कची सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
शस्त्रक्रिया होणाऱ्यांची कोरोना चाचणी आवश्यक सर्व रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. रुग्ण कोरोनाबाधित असेल आणि शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरूपाची नसेल तर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी, असे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील महापालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोरोना पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी, असेही सूचनांमध्ये नमूद आहे. कोरोनाबाधित तसेच लक्षणेविरहित रुग्ण लक्षात घेता, आरोग्य खात्याने कोरोना बाधितांच्या विलगीकरण (होम आयसोलेशन) संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित कराव्यात, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयुक्तांनी केलेल्या सूचना... महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई किट्स त्याचप्रमाणे औषधी साठा व इतर वैद्यकीय सामुग्रीचा आढावा घेऊन त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरू करावी. कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी. वैद्यकीय प्राणवायू- सर्व रुग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे.