मुंबई : सुरक्षा तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १३ ते २७ मार्चदरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेल्या तणावाच्या वातावरणामुळे दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेतून देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह जागोजागी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वस्तू आणि वाहनांची तपासणी करण्यात येत आहे़ रस्ते, रेल्वे, मुंबई मेट्रो, समुद्र किनारपट्टी अशा ठिकाणी पोलिसांचा पहारा आहे. या सुरक्षेबरोबरच येणाºया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १३ मार्च २७ मार्च या काळात जमावबंदी लागू केली आहे.याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. या काळात ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे तसेच लाऊडस्पीकर, संगीत कार्यक्रम, फटाक्यांची आतशबाजी यावर बंदी असणार आहे. यामध्ये लग्नसोहळा, अंत्ययात्रा तसेच सोसायटीतील अंतर्गत बैठका अपवाद असणार असल्याचेही त्यात नमूद आहे़
मुंबईत १३ ते २७ मार्चदरम्यान सुरक्षेसाठी जमावबंदी आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:23 PM