कारमधील सहप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक; पोलिसांचे आदेश, उल्लंघन केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:30 AM2022-10-15T05:30:34+5:302022-10-15T05:31:07+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने आता चारचाकी कारमधील सर्व सहप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ आता चारचाकी कारमधील सर्व सहप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
कारमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी चालकांना १ नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये सीटबेल्टअभावी प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचे दिसून आले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र असल्याचे नमूद आहे. त्यामुळे सर्व चारचाकी वाहनातील सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणे आवश्यक असणार आहे. सीटबेल्टची सुविधा नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"