मांडवा ते भाऊचा धक्का मार्गावरील गाळ काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:13 AM2018-01-15T01:13:52+5:302018-01-15T01:13:55+5:30
महानगरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाºया मांडवा ते भाऊचा धक्का पर्यंतच्या नियोजित सागरी मार्गातील पहिला महत्त्वाचा अडसर दूर होण्यास अखेर
मुंबई : महानगरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाºया मांडवा ते भाऊचा धक्का पर्यंतच्या नियोजित सागरी मार्गातील पहिला महत्त्वाचा अडसर दूर होण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मार्गावर अडीच मीटर पाण्याच्या खोली दरम्यान येणारा गाळ काढण्यासाठी १८ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाच्या ६ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला अखेर गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला.
सागरमाला कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी केंद्राकडून ५० टक्के अनुदान मिळणार आहे. हा जलवाहतूक मार्ग सक्षम झाल्यास, नागरिकांना जलद प्रवासासाठी आणखी एक पर्याय सुलभ होणार आहे. ४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यान नौकायन मार्गातील (रो-रो) सेवेसाठी गाळ काढण्याकरिता १८ कोटी १२ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने प्रशासकीय प्रस्ताव गेल्या वर्षी १२ जूनला गृहविभागाकडे पाठविला होता. त्यामध्ये दोन ठिकाणापर्यंतच्या मार्गाची रुंदी अंदाजे १५० मीटर व अडीच मीटर पाण्याची खोली गृहीत धरण्यात आली आहे.
गृहविभागाने या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली असून, यापैकी ५० टक्के निधी केंद्राकडून मिळणार आहे.