मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या पोलीस निरीक्षक सुनील माने याने ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांना फोन करून बोलावले होते. तावडेच्या नावाने बोलावून त्यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वतंत्र वाहनातून त्यांच्यासोबत प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार व हिरेन हत्याप्रकरणात मानेने मुख्य आरोपी असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझेला गुन्ह्यात व त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.कांदिवली गुन्हे शाखेचे (कक्ष ११) प्रभारी असलेल्या मानेने ४ मार्चला हिरेन यांना तावडे या नावाने फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर वाझे, विनायक शिंदे व नरेश गोर हे हिरेन यांना बेशुद्ध करून गाडीतून रेतीबंदरकडे घेऊन जात असतानाही माने आपल्या वाहनातून त्यांच्यासोबत होता.
नाकाबंदीत त्यांच्या गाडीची चौकशी हाेऊ नये म्हणून त्याने सोबत केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्फोटक कारप्रकरणी दाखल गुन्ह्याचा सीआययू तपास करीत होती. त्यावेळी माने हा २, ३ व ४ मार्चला मुंबई आयुक्तालयात येऊन वाझेला भेटला होता. हिरेन यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीवेळीही हजर होता. सुरुवातीला त्याने शस्त्र परवान्याच्या कामासाठी आपण मुख्यालयात आल्याचे म्हटले होते. मात्र इतरांच्या जबाबातून ही बाब खोटी असल्याचे उघड झाले.