मुंबई: वैद्यकीय सुविधा सुधारणा आणि रुग्णांसाठी पायाभूत सुविधा विकास करण्याबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सायन येथील लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि संबंधित अधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.
सायन हॉस्पिटलच्या पुनर्विकासाबाबत शासन २०१६ सालापासून प्रयत्नशील आहे, त्या अनुषंगाने रुग्णांसाठी जीर्ण झालेल्या मुख्य इमारतीची पुनर्बांधणी आणि सोबतच रेसिडेन्शियल क्वार्टर्स आणि कॉलेज बिल्डिंगचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीदरम्यान विकास आराखड्याचे सादरीकरण देखील झाले. त्याप्रमाणे हॉस्पिटलला आवश्यक जागा, त्या अनुषंगाने वाढीव वैद्यकीय क्षमता या सर्वच गोष्टी पुनर्विकासातून साध्य होणार आहेत. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी येथे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.