Join us

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 3:32 PM

आशिष शेलारांनंतर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा लोढांकडे

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं मुंबईची जबाबदारी मंगल प्रभात लोढांवर सोपवली आहे. आशिष शेलार यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. मात्र अखेर लोढांकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.  

काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या जागी मंगल प्रताप लोढा यांची निवड करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या लोढा यांची अनेकदा मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान चर्चेत होतं. मात्र आता त्यांच्याकडे मुंबई भाजपाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदासाठी खासदार मनोज कोटक आणि आमदार योगेश सागर यांची नावं चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. राज्यात मराठा कार्ड खेळणाऱ्या भाजपानं मुंबईत मात्र गुजराती, मारवाडी कार्ड वापरलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. 

 

टॅग्स :भाजपामंगलप्रभात लोढा