मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दहिसर शाखेच्या वतीने "कलावंत आपल्या भेटीला" ही मालिका सुरू आहे. या मालिकेतील सहावे पुष्प काल सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका व एकपात्री कलावंत मंगला खाडीलकर यांच्या मुलाखतीने गुंफले. मुलाखतकार शोभा नाखरे यांनी ही मुलाखत घेतली.
दहिसर (पश्चिम) रिव्हर ह्यु पार्टी हाॅल, दहिसर ब्रीजजवळ, कांदरपाडा, दहिसर ( पश्चिम) येथे सदर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व मित्र परिवाराची उपस्थिती होती. मंगला खाडिलकर यांनी चांदणं शिंपडत रसिक दहिसरकरांना मंत्रमुग्ध केले.दहिसरच्या रसिक प्रेक्षकांसाठी तर एक मेजवानीच होती. त्यांनी दिलखुलास गप्पा मारतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रम जसजसा पुढे सरकू लागला तसतसा तो अधिकाधिक बहरत गेला, गप्पा रंगत गेल्या, विविध किस्से आणि अनुभव ऐकून रसिक प्रेक्षकांनी स्वर्गीय आनंद अनुभवला अशी माहिती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दहिसर शाखेचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी दिली.तर कलावंत आपल्या भेटीला या मालिकेची सांगता चिरंतन स्मरणात राहील यात शंकाच नाही असे लेखक हेमंत मानकामे यांनी सांगितले.