Join us

मंगळागौरीसह वैविध्यपूर्ण कलांची मेजवानी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 7:02 AM

लोकमत सखी मंचने मैत्री फाउंडेशन आणि रत्ना फाउंडेशन यांच्या सहकार्याने मंगळागौरीच्या खेळाचे आणि विविध कार्यशाळांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सखींनी भरभरून प्रतिसाद दिला. मंगळागौरींच्या खेळांसह विविध कार्यशाळांच्या माध्यमातून सखींना काही क्षण मनोरंजनासह कलात्मक गोष्टींचेही मार्गदर्शन मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकमत सखी मंचने मैत्री फाउंडेशन आणि रत्ना फाउंडेशन यांच्या सहकार्याने मंगळागौरीच्या खेळाचे आणि विविध कार्यशाळांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सखींनी भरभरून प्रतिसाद दिला. मंगळागौरींच्या खेळांसह विविध कार्यशाळांच्या माध्यमातून सखींना काही क्षण मनोरंजनासह कलात्मक गोष्टींचेही मार्गदर्शन मिळाले.वरळीच्या प्राजक्ता चावरे यांनी बॅग मेकिंगच्या सेमिनारमध्ये मार्गदर्शन केले. तर विक्रोळी येथील सुकेशिनी घेगडमल यांनी उशीचे कव्हर कसे बनवावे हे शिकविले. बॅग्सचे विविध प्रकार, वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीने तयार करण्यात आलेल्या उशीच्या कव्हर्सने सखींचे मन जिंकले. यासाठीचा कच्चा माल कुठे मिळेल, घरातील कोणत्या टाकाऊ वस्तूंचा यात वापर होऊ शकतो, जुन्या साड्या व कपड्यांचा कशाप्रकारे वापर करावा याविषयीही इत्थंभूत माहिती देण्यात आली. याशिवाय, सखींना आणखी कोणत्या प्रकारचे लघुउद्योग करता येऊ शकतात याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.विलेपार्लेच्या लिटील गेम प्ले ग्रूपच्या प्राध्यापिका स्वाती पोळ यांनी योगासन शिकविले. त्याचप्रमाणे केस गळणे, मासिक पाळी, स्थूलपणा, ताणतणाव या सर्व शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपयुक्त अशी आसने प्रात्यक्षिकांद्वारे सखींना शिकविण्यात आली. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे प्रायोजक मैत्री फाउंडेशन व रत्ना फाउंडेशन होते. मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती मोहिते व सचिव सुनंदा क्षीरसागर यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. याशिवाय, रत्ना फाउंडेशनच्या रत्ना नोबोत्री यांचेही सहकार्य कार्यक्रमाला लाभले.तर ‘खेळ खेळूया... मंगळागौरीचा’ या कार्यक्रमात मुंंबई सेंट्रलच्या शीला पवार यांनी त्वचेची काळजी, केसांची काळजी, पेडीक्युअर-मेनिक्युअर, क्लीनअप याविषयी माहिती दिली. पवार या ताडदेव येथील ‘शलाका’ ब्युटी पार्लरच्या प्रमुख असून गेली अनेक वर्षे सौंदर्यशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. तर सौंदर्यतज्ज्ञ सविता गायकवाड यांनी महिलांना फेशिअल कसे करावे हे शिकविले, त्याही अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. खारघरच्या नेत्रा नागेश यांनी नाइट क्रीम, अ‍ॅँटी एजिंग क्रीम घरच्या घरी कसे करावे याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे, उपस्थितांनी सौंदर्य व घरगुती उपाय याविषयी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. माझगाव येथील निकिता मोहिते यांनी प्रोफेशनल मेकअप घरच्या घरी कसा करावा हे दाखविले. आपल्या त्वचेच्या पोताप्रमाणे कोणते क्रीम लावावे, कोणते योग्य आहे याची माहिती दिली.सेमिनार्सनंतर अंधेरी येथील इंद्रधनु कलारंगच्या अनिता पेंढारकर यांनी व चमूने दीपनृत्य, टिपºया सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली. त्यानंतर दादरच्या सुप्रसिद्ध ‘पंरपरा’ ग्रूपने सुरेख मंगळागौर सादर केली. यासाठी खास मराठमोळ्या पारपंरिक वेशात उपस्थित राहिलेल्या सखींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनाही ‘परंपरा’ ग्रूपमधील सदस्यांनी सहभागी करून घेत फुगड्या, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपºया, गोफ, अडवळ घूम पडवळ घूम असे अनेकविध खेळ सादर करण्यात आले.