सीटीईटी परीक्षेकरिता मंगळसूत्र, हिरवा चुडा उतरवला! महिला उमेदवारांमध्ये नाराजी
By मनोहर कुंभेजकर | Published: August 20, 2023 11:41 AM2023-08-20T11:41:53+5:302023-08-20T11:42:08+5:30
सकाळच्या सत्राच्या पेपरसाठी या केंद्रावर सुमारे साडेतीनशे परीक्षार्थी राज्यातील विविध भागातून आले होते.
मुंबई-पेपरपुटीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू आहे,आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा विविध केंद्रांवर सुरू आहेत. मालाड पश्चिम केंद्रीय विद्यालय, आय. एन. एस. हमला येथील परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थींना गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील हिरवा चुडा उतरवण्याची सक्ती करण्यात आली. हातातून बांगड्या न निघाल्याने अक्षरशः दगडांनी फोडाव्या लागल्या. सौभाग्याचा हा ठेवा उतरवताना अनेकींना हुंदका अनावर झाला. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्यासह आलेल्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.
या परीक्षेसाठी दोन पेपर, दोन सत्रात घेतले जाणार आहेत. सकाळच्या सत्राच्या पेपरसाठी या केंद्रावर सुमारे साडेतीनशे परीक्षार्थी राज्यातील विविध भागातून आले होते. त्यांना हॉल तिकीट, पेन, ओळखपत्र, पेन या व्यतिरिक्त अन्य साहित्य नेण्यास मज्जाव करण्यात आला. बाहेरून आलेल्या उमेदवारांनी अक्षरशः गयावया केल्यावर अर्ध्या तासांनी बॅग नेण्यास परवानगी दिली. मात्र हा अडथळा पार केल्यानंतर गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले आणि हातातील बांगड्या काढण्यास सांगण्यात आले. त्यामुळे विवाहीत महिलांनी त्याला विरोध दर्शवत, काटेकोर तपासणी करा, मात्र सौभाग्याचे लेणे उतरवण्याची सक्ती न करण्याची विनंती केली. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यामुळे अनेकींच्या भावना अनावर झाल्या.
नोकरीच्या वेड्या आशेपायी त्यांनी निमूटपणे थरथरत्या हातांनी या वस्तू उतरवल्या. काहिजणींना ते अशक्य झाल्याने नवऱ्याला दगडांनी हिरवा चुडा फोडावा लागला. पाणावलेल्या डोळ्यांनी तसेच प्रचंड दबावाखाली परीक्षेला सामोरे जावे लागल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण पसरले होते.