Join us

दहिसरमध्ये उभारणार मँग्रोज जेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:34 AM

शासन, वनविभाग आणि महाराष्ट्र मँग्रोज फाउंडेशनच्या वतीने दहिसर येथे मँग्रोज जेट्टी आणि पार्क उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना भारतीय तिवर, किर्प, लहान झुंबर, सोनचिप्पी किंवा किरकिरी, लाल कांदळ, मोठा कांदळ अशा वेगवेगळ्या

सागर नेवरेकर मुंबई : शासन, वनविभाग आणि महाराष्ट्र मँग्रोज फाउंडेशनच्या वतीने दहिसर येथे मँग्रोज जेट्टी आणि पार्क उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना भारतीय तिवर, किर्प, लहान झुंबर, सोनचिप्पी किंवा किरकिरी, लाल कांदळ, मोठा कांदळ अशा वेगवेगळ्या प्रजातीची तिवरे पाहता येणार आहेत. छोटा पाणकावळा, तिरंदाज, सागरी बगळा, गायबगळा असे विविध पक्षीदेखील पाहायला मिळणार आहेत. विशिष्ट प्रजातीच्या तिवरांची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यासाठी एक विशेष माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. बोटीने प्रवास करीत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या प्रजाती, तिवर, विविध प्रजातीचे पक्षी, मासेमारी कशी केली जाते, याची माहिती पर्यटकांना दिली जाणार आहे.पश्चिम उपनगरात ओशिवरा, पोईसर, दहिसर अशा तीन नद्या आहेत. या तीनही नद्यांचे पाणी ज्या ठिकाणी एकत्र येते ते ठिकाण म्हणजे गोराई खाडी. मात्र, आता दहिसर जेट्टी ते गोराई जेट्टी हे २ किलोमीटरचे अंतर बोटीच्या माध्यमातून पार करत पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगारही निर्माण होईल. येत्या सात ते आठ महिन्यांत मुंबईकरांना मँग्रोज पार्कचा आनंद अनुभवायला मिळणार आहे.आमदार मनीषा चौधरी यांनी यासंदर्भात सांगितले, नॅशनल पार्क आणि पश्चिमेला असलेले तिवरांचे जंगल ही दहिसरला निसर्गाने दिलेली देणगी आहे. मुख्यमंत्र्यांकडे तिवरांच्या संरक्षणासाठी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत दहिसर नदीचे पुनरुज्जीवन आणि मँग्रोज पार्क तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मँग्रोज पार्क बनविण्यासाठी महाराष्ट्र मँग्रोज फाउंडेशनकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तिवरांच्या जंगलामध्ये प्लास्टीकचा कचरा प्रचंड साचत आहे. परिणामी, तिवरांचे जंगल नष्ट होऊ लागले आहे. प्रथमत: तिवरांच्या जंगलाची साफसफाई करण्यात आली. तसेच तिवरांच्या जंगलात जेट्टी बनविण्यात येणार असून लोकांसाठी पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पर्यटनात दीड ते दोन किलोमीटरमध्ये समुद्र सफारी करू शकता. स्थलांतरित समुद्रपक्षी हे दहिसरच्या मँग्रोज पार्कात मोठ्या प्रमाणात येतात. येथे तिवरांच्या नऊ प्रजाती आहेत. त्यामुळे, या विविध तिवरांच्या प्रजाती पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी ५ ते ७ कोटी रुपये खर्च करत आहोत. परंतु, संपूर्ण प्रकल्प चांगल्या प्रकारे करण्यासाठी १०० ते १५० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.मँग्रोज पार्क व क्रॅब कल्टिवेशन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मँग्रोज पार्कात पर्यटकांसाठी प्रदर्शन आणि इंटरप्रिटेशन सेंटर, लायब्ररी आणि कॅफेटिरीया, गार्डन, मँग्रोज रिस्टोरेशन आणि रिजिनटेशन, बोर्ड वॉक, बोटिंग, फेंन्सिग आणि वॉच टॉवर इत्यादी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी जास्तीचा निधी लागणार आहे.बोटिंग सफारी७ ते ८ महिन्यांत बोटिंग सफारीला सुरुवात होईल. जेट्टी तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मँग्रोज फाउंडेशन आणि वनविभागाच्या माध्यमातून हे मँग्रोज पार्क तयार होत आहे.महापालिकेच्या बजेटमधूनही महाराष्ट्र मँग्रोज फाउंडेशनला निधी देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.