Join us

मॅनहोल्स बनतायत मृत्यूचे सापळे; एकाच आठवड्यात तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 9:52 AM

पद्धत बंद होणार तरी कधी? संतप्त नागरिकांचा सवाल.

मुंबई : हाताने मैला साफ करणे जीवघेणे ठरत आहे.  आठवड्याभरात शौचालयाची टाकी, गटार साफ करताना ३ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्ह्याची कारवाई सुरू असली तरी पालिकेला जाग केव्हा येणार? असा प्रश्न मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. मालवणीत देखील शौचालयाच्या पाणी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा सुरक्षेअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

आशियातील श्रीमंत महापालिकेकडे आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही हाताने गटारांची सफाई, मैला साफ करण्याची वेळ का येते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मलवाहिन्यांच्या सफाईसाठी माणसे मॅनहोलमध्ये उतरवली जातात. विषारी वायुमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. काहींना श्वसनाचे जीवघेणे विकार घेऊनच उर्वरित आयुष्य जगावे लागते. 

या पूर्वीच्या घटना : 

२५ जून २०२३ - गोवंडी येथे शिवाजीनगर बस आगाराच्या बाजूला मलनिस्सारण वाहिनीच्या ‘मॅनहोल’मध्ये सफाईचे काम करताना दोघांचा मृत्यू झाला.

२६ जून २०२३ - भूमिगत गटाराची स्वच्छता करताना कारने धडक दिल्याने कामगाराचा त्याच गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना कांदिवली परिसरात घडली.

स्कॅवेंजिंगला बंदी -

या कामावरून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होऊ लागल्याने मॅन्युअल प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने १९९३ आणि २०१३ साली कायद्यानुसार मॅन्युअल स्कॅवेंजिंगला बंदी घातली. 

पाच कामगार गटारात पडले, एकाचा मृत्यू :

शिवडी गाडी अड्डा येथे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू असताना उघड्या गटारात पाच कामगार पडल्याची घटना रविवारी पहाटे घडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला. चार कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. 

हे सर्व कामगार २० ते २५ वयोगटातील आहेत. या पाचही कामगारांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले असून, केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी मेहबूब (वय १९) कामगाराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ४ कामगारांवर उपचार सुरू असून, सलीम या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. शफाकुल (वय २२), कोरेम (वय ३५), मोझालीन (वय ३०) हे तीन कामगार रुग्णालयात दाखल आहेत.

मालाडच्या घटनेत नोटीस -

१) मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. 

२) मालवणीत घटना घडलेले शौचालय हे ओम जय दुर्गा सेवा सोसायटी या खासगी संस्थेंतर्गत चालविण्यास देण्यात आलेले आहे. 

३) त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी ही संस्थेची असून,  याबाबत खुलासा करण्याची नोटीस दिली आहे.

यंत्राचे काय झाले?

मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उच्च क्षमतेची सफाई यंत्रे, गाळ व मैला काढण्यासाठी उपसा यंत्रे यासाठीचे नियोजन करते. मग त्या यंत्राचे काय झाले? ती सुशोभीकरणासाठी वापरली जात आहेत का? असा सवाल गोवंडी सिटिजन्सचे फय्याज आलम शेख यांनी उपस्थित केला आहे. 

आजही तीच स्थिती -

पालिकेकडून अनेक वॉर्डात या मॅनहोलच्या सफाईचे काम कंत्राटदारांना दिले जाते. हे कंत्राटदार कामगारांना गटारात उतरवून, हाताने गाळ, मैला बाजूला करताना दिसून येत आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका