पुरुषांविषयीचा दृष्टिकोन बदलणारे ‘मर्दानगी’
By admin | Published: December 10, 2015 02:15 AM2015-12-10T02:15:26+5:302015-12-10T02:15:26+5:30
पुरुष म्हणजे कणखर, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा, सगळ्या संकटांचा सामना करणारा, हातात सत्ता असणारा, दु:ख सोसूनही अश्रू न ढाळणारा अशी प्रतिमा समाजाने तयार केली आहे
मुंबई : पुरुष म्हणजे कणखर, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा, सगळ्या संकटांचा सामना करणारा, हातात सत्ता असणारा, दु:ख सोसूनही अश्रू न ढाळणारा अशी प्रतिमा समाजाने तयार केली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ‘मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स अॅण्ड अब्युज’ (मावा) संघटनेने एकत्र येऊन पथनाट्याद्वारे जनजागृती सुरू केली आहे. याअंतर्गत ‘मर्दानगी’ हे पथनाट्य सादर करण्यात येत आहे.
समाजमान्य प्रतिमेमुळे पुरुषांची होणारी घुसमट समाजासमोर आणणे गरजेचे आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत पुरुषांची ही घुसमट तरुण मुलांनी मांडल्यास अधिक प्रभावीपणे पुढे येऊ शकते. या विचारातून ‘मावा’ने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात मुलांमध्ये दडलेले नेतृत्वगुण नाट्याद्वारे कसे पुढे येऊ शकतात, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. चार दिवस नाट्यप्रशिक्षण देण्यात आले. यात २४ मुले आणि काही मुली सहभागी झाल्या होत्या. १० डिसेंबर म्हणजेच मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला. १० डिसेंबरनंतरही तो राहणार आहे. पथनाट्यातून जनजागृती करण्यात येणार आहे.
यातूनच २० मिनिटांचे ‘मर्दानगी’ हे पथनाट्य साकार झाले आहे. या पथनाट्यात तरुण मुलेच समाजातील प्रस्थापित संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पुरुष म्हणजे त्यांनी विशिष्ट चौकटीतच वागले पाहिजे. एका विशिष्ट प्रकारेच ते व्यक्त व्हावेत, याच्या काही रूढ संकल्पना आहेत.
प्रत्यक्षात मात्र या चौकटीपलीकडे पुरुषांना जायचे असते. या पथनाट्यातून तरुण मुलेच प्रश्न उपस्थित करत असल्याचे ‘मावा’चे हरीश सदानी यांनी सांगितले. कीर्ती, गुरुनानक खालसा, रुपारेल, सिद्धार्थ, निर्मला निकेतन कॉलेज आॅफ सोशल वर्क या महाविद्यालयांचे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.(प्रतिनिधी)