लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एक वेळचे निवासस्थान असलेले, तसेच शांती, स्वतंत्रप्रिय लोकांचे शक्तिस्थान असलेले मुंबईतील मणिभवन आजही गांधी विचार आणि स्वतंत्र लढ्याच्या आठवणींची जपणूक करीत आहे. या ऐतिहासिक वास्तूला पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येतात. मात्र, बदलत्या काळात तरुणांचा ओढा मणिभवनकडे वाढला आहे. यंग इंडियाची मोठी पसंती मणिभवनला मिळत आहे.
१९१७ ते १९३४ हा काळ महात्मा गांधी आणि मणिभवन यांच्या अनेक आठवणींचा सुवर्णकाळ आहे. कापूस पिंजण्याचे कताईचे धडे घेण्यापासून ते आगाशीतल्या गांधींच्या अटकेपर्यंतचा प्रवास या काळात झालेला आहे. १९३१ काँग्रेस कार्यकारिणीची सभा, असहकाराचे आंदोलन, अशा अनेक घटनांचा मणीभवन साक्षीदार आहे.
डौलाने वास्तू उभी
ग्रॅन्ट रोड येथील गावदेवी लेबरमन रोडवर मणिभवनची वास्तू आजही डौलाने उभी आहे. या ऐतिहासिक वास्तूत गांधीजींनी स्वतः चाळलेली दोन हजार पुस्तके आहेत. इतर सर्व पुस्तके मिळून अडीज लाख पुस्तकांचे सुसज्ज असे वाचनालय वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गांधीजींची बैठकीची आणि कामकाजाची खोली मणिभवनच्या दुसऱ्या माळ्यावर कोणताही बदल न करता जतन करण्यात आली आहे, तसेच गांधीजींच्या आयुष्यातील २८ प्रसंग बाहुल्यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहेत. महत्त्वाचे प्रसंग दर्शविणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन येथे आहे.
दिवसा ५०० जणांची भेट
- मणिभवन वर्षभर सुरू असते. वर्षाला ५ ते ६ लाख लोक मणिभवनला भेट देतात. दिवसाला ४०० ते ५०० लोक येथे येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि तरुण येत आहेत.
- हिंसक वातावरणात गांधी विचार तरुणांना आपलासा वाटू लागला आहे. येथील लाखो पुस्तकांच्या आधारे शेकडो लोकांनी पीएच.डी केल्या आहेत, अशी माहिती मणिभवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम आजगावकर यांनी दिली.