Join us

नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरणाला वाचवा; मुंबई उत्तरासाठी जाहीरनामा

By सीमा महांगडे | Published: May 03, 2024 5:32 PM

प्राथमिक सुविधांची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ संमिश्र असून मुंबई शहरातील लोकसंख्या उत्तरेच्या दिशेला वाढू लागली आहे. त्यामुळे मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या मतदार संघात वाढत असलेला झोपड्पट्टीचा परिसर हे येथील मोठी समस्या आहे. वन जमिनीसह जिल्हाधिकारी यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने त्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सोबत या अभंगातील महत्त्वाच्या नद्यांचे पुनरुज्जीवन आणि त्यामुळे पर्यावरणाचा राखला जाणार समतोल या मुद्दयांवर येथील भावी खासदारांनी लक्ष केंद्रित करावे ही येथील स्थानिक रहिवासी आणि सेवाभावी संस्थांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मार्च या पर्यावरण, मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर आणि झोपडपट्टी यावर काम करणाऱ्या संस्थेने मुंबई उत्तरसाठी जाहीरनामा उमेदवारांपुढे मांडला आहे.

मुंबई उत्तरामध्ये असलेल्या दहिसर , पोयसर नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहे. त्यामुळे या नद्या आणि उपनद्यांचा प्रश्न आवश्यक ती कार्यवाही करून मार्गी लावणे आवश्यक आहे. विकासक आणि खासगी जमीन मालकांकडून नद्यांच्या परिसरात करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे पूर क्षेत्रांमध्ये वाढत होत आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई आवश्यक असल्याची मागणी मुंबई मार्चकडून करण्यात आली आहे. गोराई, मनोरीसारख्या कांदळवन आणि जंगलाने वेढलेल्या परिसरात अनेक प्रकारचे प्राणी , पक्षी आणि जैव विविधता आहे. त्यामुळे वन जमिनी, कांदळवने आणि हरित क्षेत्राचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील पर्यावरणाचा ऱ्हास हा मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर कांदळवने कापली कापली जात असून वन जमिनीचाही वापर केला जात आहे.   मात्र निःक्षारीकरण सारखे प्रकल्प , सौंदर्यीकरण, पुलांची बांधणी यासारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहचण्याची शक्यता आहे. त्या ऐवजी तेथील स्थानिकांसाठी शाळा, दर्जेदार रुग्णालय, जेट्टी आणि पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी मुंबई मार्चकडून करण्यात आली आहे.या शिवाय विविध मुद्यावर मुंबईमार्चकडून पुढील काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

- दहिसर चेक नाक्यावर मोकळ्या जागेत पार्किंगसाठी सुविधा आणि बस स्टेशन टर्मिनलची आवश्यकता

-   पालिकेच्या शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रे यांची सुधारणा आवश्यक असून तेथे सामान्य नागरिकांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा मिळणे  आवश्यक आहे.

- मुंबई उत्तर मध्ये सगळ्यात जास्त हरित क्षेत्र असले तरी येथे होत असलेली अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्क परिसराच्या पश्चिमेला काजू पाडा, दामू पाडा, अप्पा पाडा भागांमध्ये अशा भागांमध्ये सुविधा पोहचत नाहीत

- या परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या, रिक्षांची बेसुमार वर्दळ, अनधिकृत बांधकामे यांची गर्दी आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, धुळीचा सामना नागरिकांना करावा लागेलमुंबई उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराने किमान मतदारसंघातील प्राथमिक गरजा आणि महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे. आमच्या जाहीरनाम्यात असणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्यात आले तर रहिवाश्याना मोठा दिलासा मिळेलच शिवाय उत्तर मुंबईचा विकास अधिक झपाटयाने करता येईल - अविनाश थरवानी , सदस्य, मुंबई मार्च.

टॅग्स :मुंबई उत्तरपीयुष गोयलभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४