नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:14 AM2024-05-03T11:14:01+5:302024-05-03T11:18:02+5:30
मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या आहे.
मुंबई : शहरातील लोकसंख्या उत्तरेच्या दिशेला वाढत आहे. मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या आहे. वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झोपड्या असून, त्यातील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या भागातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भावी खासदाराने भर द्यावा, अशी अपेक्षा येथील रहिवासी आणि सेवाभावी संस्थेने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मार्च’या पर्यावरण, मुंबईतील पायाभूत सुविधा आणि झोपडपट्टी या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेने या मतदारसंघातील उमेदवारांपुढे जाहीरनामा मांडला आहे. दहिसर, पोयसर नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न अनेक वर्षे रखडला आहे. विकासक, खासगी जमीन मालकांकडून नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे पूर क्षेत्रांमध्ये वाढत होत आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘मुंबई मार्च’ने केली आहे.
गोराई, मनोरी येथील कांदळवन व जंगलाने वेढलेल्या परिसरात अनेक प्राणी, पक्षी आणि जैवविविधता आहे. त्यामुळे वन जमिनी, कांदळवने आणि हरित क्षेत्राचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील पर्यावरणाचा ऱ्हास हा मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे.
विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर कांदळवनांची कत्तल होत असून, वन जमिनीचाही वापर केला जात आहे.
मात्र, निःक्षारीकरणासारखे प्रकल्प, सुशोभीकरण, पुलांची बांधणी, अशा प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्याऐवजी तेथील स्थानिकांसाठी शाळा, दर्जेदार रुग्णालय, जेट्टी आणि पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी ‘मुंबई मार्च’ने केली आहे.
‘मुंबई मार्च’च्या मागण्या-
१) दहिसर चेकनाक्यावर मोकळ्या जागेत पार्किंगसाठी सुविधा, तसेच बस टर्मिनल उभारावे.
२) पालिका शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रांत आवश्यक सुधारणा कराव्यात. सर्व प्राथमिक सुविधा तेथे मिळाव्यात.
३) अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसराच्या पश्चिमेला काजूपाडा, दामूपाडा, अप्पापाडा येथे सुविधा पोहोचत नाहीत.
४) वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास हे प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.
मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराने प्राथमिक गरजा आणि महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे. आमच्या जाहीरनाम्यात मांडलेल्या समस्यांकडे लक्ष दिल्यास रहिवाशांना मोठा दिलासा मिळेलच. शिवाय मतदारसंघाचा विकास अधिक झपाट्याने करता येईल.- अविनाश थरवानी, सदस्य, मुंबई मार्च