Join us

मणिपूरचे राज्यपाल सैयद अहमद यांचे मुंबईत निधन

By admin | Published: September 28, 2015 2:13 AM

मणिपूरचे राज्यपाल सैयद अहमद यांचे रविवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते

मुंबई : मणिपूरचे राज्यपाल सैयद अहमद यांचे रविवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.अहमद हे कर्करोगाने पीडित होते आणि त्यांना गेल्या आठवड्यात बांद्रा येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. अहमद यांनी १६ मे २०१५ रोजी मणिपूरच्या राज्यपालपदाची शपथ ग्रहण केली होती. महाराष्ट्रातील माजी काँग्रेस नेते अहमद हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते. तत्कालीन संपुआ सरकारने २६ आॅगस्ट २०११ रोजी त्यांना झारखंडचे राज्यपाल नियुक्त केले होते. अहमद हे राजकारण करीत असतानाच लेखन कार्यही करीत होते. ‘पगडंडी से शहर तक’ हे आत्मचरित्र आणि ‘जंग-ए-आजादी मे उर्दू शायरी’ व ‘मकताल से मंजिल’ ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. १९७७ मध्ये काँग्रेस पक्षात सामील झालेले अहमद हे मुंबईच्या नागपाडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर पाच वेळा निवडून आले होते. ते महाराष्ट्रात गृहनिर्माण खात्याचे मंत्रीदेखील होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अहमद यांच्या निधनामुळे पक्षाचे आणि देशाचे मोठे नुकसान झाल्याचे कामत म्हणाले. (वृत्तसंस्था)