मुंबई : ईशान्य भारत हा लढवय्यांचा प्रदेश आहे. तेथील राज्यांची कामगिरी लक्षणीय आहे. अन्य राज्यांप्रमाणेच येथील राज्यांमध्येही लोकांची ताकद व सहभाग लक्षणीय आहे. या छोट्या राज्यात आज एनडीएसाठी १७ जणांची निवड झाली. या राज्याने चार लेफ्टनंट जनरल दिले, तर माजी सैनिकांची संख्या येथे २० हजारांपेक्षा जास्त आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या या मणिपूर राज्यातील ही टक्केवारी पाहिली तर देशाच्या संरक्षणासाठी मणिपूरचा वाटा किती लक्षणीय आहे ते समजून येते. असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल एल. एन. सिंग यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रविवारी त्यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. ईशान्य भारत आणि मणिपूर येथील बदलाचे वारे याबद्दल सिंग यांनी ईशान्य भारताबाबतची माहिती दिली.
ते म्हणाले, येत्या ऑलिंपिकमध्ये मणिपूरचे पाच जण असून, लोकसंख्येच्या तुलनेत एक ॲथलिट मणिपूरमधील असेल. यात पंजाबचा १.४ आणि हरयाणाचा २.४ असे प्रमाण आहे. मणिपूर हे क्रीडा क्षेत्रातील एक ऊर्जाघरच आहे. हॉकी, फुटबॉल, बॉक्सिंग, आर्चेरी, वेटलिफ्टिंग, ज्युडो यामध्ये प्रवीण असणारे खेळाडू येथे अधिक आहेत. हॉकीमध्ये सात जण मणिपूरचे आहेत. अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार प्राप्त खेळाडूही येथे आहेत. येथील अनेक खेळाडू युरोपातही जाऊन खेळतात. राष्ट्रीय स्पर्थेत महिलांनी १९ वेळा स्पर्धा जिंकली असून, बॉक्सिंगमध्ये मेरि कोम, हॉकीमध्ये सुशीला, नीलकांता सरमा, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चनू, ज्युडोमध्ये सुशीला आशा महिलांचा समावेश आहे.
ऐतिहासिक स्थळे, तसेच निसर्गसौंदर्य यांचा विकास होत आहे. येथे कृषी उत्पादनांनाही चांगला वाव आहे. त्यामुळे येथून नागरिक भारतातील अन्य भागात जाऊ शकतात. आशियातील महिलांनी चालविलेली सर्वांत मोठी बाजारपेठ येथे आहे. ४०० वर्षांपासून असणाऱ्या या बाजारामध्ये सुमारे सात हजार महिला कार्यरत आहेत. त्यामुळे मणिपूर राज्यात महिलांना महत्त्वही असल्याचेही सिंग यांनी सांगितले.