मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच मास्टरमाईंड; सुनील पाटीलचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:07 AM2021-11-08T08:07:51+5:302021-11-08T08:08:24+5:30
५० लाखांच्या डीलमध्ये सहभाग असल्याचे स्पष्टीकरण; कंबोज यांनी केलेले आरोप फेटाळले
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसुझा आणि मोहित कंबोज यांच्या आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या सुनील पाटील यांनी अखेर मुंबई गाठून अनेक गौप्यस्फोट केले. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा पाटील यांनी माध्यमांसमोर केला आहे. आपण फक्त यामध्ये ५० लाखांची डील केली होती, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मोहीत कंबोज यांनी पाटील हेच याप्रकरणाचे मास्टरमाईंड आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तसेच बदली रॅकेटमध्येही त्याचा सहभाग असल्याचा आरोप केला. पण मूळचे धुळ्याचे रहिवासी असलेले पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावी याला आपण २२ सप्टेंबरला पहिल्यांदा भेटलो. २७ तारखेला मनीष भानुशाली यांच्यासोबत मी अहमदाबादला गेलो. ड्रग्जप्रकरणी भानुशालीला टीप मिळाली होती. क्रूझवरील ड्रग पार्टीची एक तारखेला टीप मिळाल्यानंतर गोसावी, भानुशालीने सोबत काम करण्यास सांगितले. तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यासोबत कोणी ओळखीचे आहे का? याबाबत चौकशी केली. मात्र माझी ओळख नसल्याने सांगितले. तसेच या कामासाठी नकार दिला. त्यानंतर, गोसावी आणि मनीष भानुशाली गुजरातच्या गांधीनगर येथील मंत्रालयात गेले. साडेचारच्या सुमारास कॉल करताच मनीषने आयबीच्या जडेजा नावाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक सुरू असल्याचे सांगितले.
या बैठकीनंतर रात्री पुन्हा कॉल करत एनसीबीतील ओळखीबाबत विचारल्यानंतर सॅमचा नंबर त्यांना पाठवला होता. सॅम डिसुझाला चार महिन्यांपूर्वी एका ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने समन्स पाठवले होते. त्यावेळी त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले, आणि त्यानंतर तो या प्रकरणातून सुटला. हे प्रकरण माहीत असल्याने सॅम डिसुझाचा नंबर गोसावीला दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच चार दिवस अहमदाबादला असल्याने जास्त माहिती नसल्याचे सांगितले.
जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर मुंबईत धाव
अहमदाबादवरून मला दिल्लीत बोलावून घेत मनीष आणि धवल भानुशालीने दिल्लीतील हॉटेलमध्ये मारहाण केली. त्यानंतर तेथून अहमदाबादला रवाना झालो. पुढे, अहमदाबादला जीवे मारण्याची भीती निर्माण होताच मुंबईत धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
क्रूझ पार्टीचे गुजरात कनेक्शन
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात कारवाईपूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांसोबत बैठका झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला. तसेच गोसावी आणि भानुशाली यांची गुजरातच्या मंत्रालयात नेमकी कुणासोबत बैठक झाली याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या कुठल्याच पक्षाशी संबंध नाही ...
पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार, १९९९ ते २०१६ पर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होतो. त्यानंतर मी कुठल्याच पक्षात जास्त कार्यरत नव्हतो. तसेच नवाब मलिक यांना देखील कधी भेटलो नसून फक्त १० ऑक्टोबरला फोनवरून बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.
समीर वानखेडेलाही ओळखत नाही
पाटील यांनी समीर वानखेडे यांनादेखील ओळखत नसल्याचे सांगितले. आपण फक्त कारवाईनंतर अभिनंदनाचा मेसेज पाठवल्याचेही पाटील म्हणाले.
आधी सेल्फी नंतर सेटिंग...
दुसऱ्या दिवशी सॅम मनीष आणि किरण गोसावी एकत्र होते. रात्री अडीचनंतर गोसावीने आर्यन सोबतचा सेल्फी पाठवला. यात शाहरुखचा मुलगा असून यात काही सेटिंग होईल का अशी विचारणा केली. मात्र तेव्हाही मी नकार दिला. त्यानंतर एनसीबीच्या कारवाईनंतर पहाटेच्या सुमारास शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीसोबत व्यवहार झाल्याचे सॅमने कॉल करून सांगितले.