Join us

एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:36 AM

वेशभूषा बदलणार, साडी हद्दपार होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांत आपल्या विमान कंपनीचा पूर्णपणे कायापालट करू पाहणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशातदेखील लवकरच बदल होणार असल्याची माहिती आहे. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशाचे डिझाइन प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा करणार असल्याची चर्चा आहे.

१९६२ पासून एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी हा गणवेश निश्चित करण्यात आला होता, तर पुरुषांसाठी सूट हाच गणवेश देण्यात आला होता. यापैकी महिला कर्मचाऱ्यांच्या गणवेशातून साडी हद्दपार होण्याची चर्चा असून, त्या जागी पंजाबी ड्रेस किंवा रेडिमेड साडीसदृश काही अभिनव डिझाइन तयार होत असल्याची देखील चर्चा आहे. १९६२ मध्ये जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल केला होता. त्यावेळी महिला कर्मचारी स्कर्ट, टॉप व हॅट असा गणवेश परिधान करत होत्या. मात्र, त्यांना साडी हा गणवेश देण्यात आला. नेमक्या पद्धतीने साडी नेसण्याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते. त्यानंतर गेली पाच दशके एअर इंडियाच्या महिला कर्मचारी अत्यंत अभिमानाने हा गणवेश परिधान करत आहेत. 

नोव्हेंबरपासून नव्या गणवेशाची शक्यताटाटा समूहाने एअर इंडियाची पुन्हा खरेदी केल्यानंतर कंपनीत अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विमान, बोर्डिंग पास आदींची रंगसंगतीदेखील बदलली आहे. आजवर एअर इंडियाची ओळख असलेल्या महाराजालादेखील कंपनीने विराम दिला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कंपनी काम करत आहे. कंपनीने नव्याने सादर केलेल्या रंगसंगतीशी ताळमेळ असणाऱ्या रंगातच नवे गणवेश असतील, अशीही चर्चा आहे. येत्या नोव्हेंबरपासून कंपनीचे कर्मचारी नव्या गणवेशात दिसतील, असे समजते.

टॅग्स :एअर इंडियामुंबई