मणिशंकर अय्यर गैरसमज पसरवताहेत - रणजीत सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:09 AM2018-05-09T07:09:21+5:302018-05-09T07:09:21+5:30
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत धादांत खोटी आणि तथ्यहीन विधाने केली आहेत.
मुंबई : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत धादांत खोटी आणि तथ्यहीन विधाने केली आहेत. सावरकरांबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचाच हा प्रकार आहे. सातत्याने अशा प्रकारे विधान करणाºया अय्यर यांचे मानसिक संतुलन तर बिघडले नाही ना, अशी शंका असल्याची प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.
मणिशंकर अय्यर यांनी लाहोर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा रणजित सावरकर यांनी समाचार घेतला. अय्यर यांनी सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतल्या आहेत. यापूर्वी भारत-पाकिस्तान वादात त्यांनी पाकिस्तानाच्या बाजू घेतली होती, तर १९६२ साली चीन युद्धाच्या वेळी त्यांनी चीनसाठी निधी संकलनाचे काम केले होते. देशविरोधी कारवाया करणारे मणिशंकर अय्यर सावरकरांविरोधात गरळ ओकणार, हे स्वाभाविक असल्याचे रणजित सावरकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात गैरसमज पसरविण्यात आले. सावरकरांवरील आरोपांना वेळोवेळी उत्तर देऊन आरोपकर्त्यांना निरुत्तर
केले गेले आहे. तरीही पुन्हा पुन्हा खोटेनाटे आरोप केले जात आहेत. अशा प्रकारांमुळे सावरकरांच्या मोठेपणाला किंचितही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.