Join us  

कॉर्पोरेट क्षेत्र सोडून मंजिरी निरगुडकर-राव बनल्या शेतकरी

By सचिन लुंगसे | Published: October 05, 2022 9:58 AM

यशाच्या शिखरावर असतानाही माहीमकर असलेल्या मंजिरी निरगुडकर-राव यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील लठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारली.

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: यशाच्या शिखरावर असतानाही माहीमकर असलेल्या मंजिरी निरगुडकर-राव यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील लठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारली आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शेती कसायला सुरुवात केली. नुसती शेती करून त्या थांबल्या नाहीत तर आपल्या शेतातून निघणाऱ्या पिकांतून त्यांनी उत्पादने घेण्यास सुरुवात केली. आपली आजी आपल्याला जे जे खाऊ घालते ते ते पीक त्यांनी आपल्या शेतीतून घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या शेतातून तयार झालेली उत्पादने विदेशात निर्यात होत असून, २०१६ साली कॉर्पोरेट क्षेत्राला रामराम ठोकणाऱ्या मंजिरी निरगुडकर आज पक्क्या शेतकरी झाल्या आहेत.

निरगुडकर-राव यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. मार्केटिंगमधून त्यांनी एमबीए केले. १२ वर्षे त्यांनी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये मार्केटिंग फिल्डमध्ये डिजिटल मार्केटिंग हेड म्हणून काम केले. सगळे काही छान सुरू होते. ते त्यांचे काम एन्जॉय करत होत्या. यश त्यांच्या पायाशी लोळत होते. मात्र, १२ वर्षांनी त्यांना वाटले की आपण आयुष्यात काहीच वेगळा असा विचार करत नाहीत. रोज सकाळी साडेआठ वाजता निघतो. रात्री साडेआठला घरी येतो. त्यामुळे वेगळा असा विचार करण्यासाठी स्वत:ला वेळ मिळत नाही. १२ वर्षांनी त्यांच्या मनात आले की कुठे तरी थोडेसे थांबले पाहिजे. वेगळा विचार केला पाहिजे. अखेरीस त्यांनी आपली मनीषा पती डॉ. अखिल राव यांना सांगितली. त्यांनीही त्यास पाठिंबा दर्शवला. 

नोकरी सोडल्यानंतर पुढील दोन ते तीन महिने मंजिरी यांनी आपल्याला काय करता येईल, याचा विचार केला. आपला कल शेतीकडे आहे, हे त्यांना उमगलं. वडील सुधीर निरगुडकर यांनीही पॅशन म्हणून शेती सुरू केली होती. व्यवसायाने मात्र ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. हे सगळे मंजिरी लहानपणापासून पाहत आल्या होत्या. एसीमध्ये बसणे, व्हाईट कॉलर जॉब अशा सवयी असतानाही हे सगळे सोडून मंजिरी शेती करू लागल्या. 

आज शेतातून चाळीसहून जास्त उत्पादने त्या घेत आहेत. मध, तांदूळ, मसाले, चटण्या यांचा त्यात समावेश आहे. लहान मुलापासून आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकाला हवेहवेसे वाटेल, अशी कृषी उत्पादने मंजिरी निरगुडकर-राव घेत आहेत. निर्णय सार्थकी लागल्याचे समाधान आहे.  

काही तरी वेगळं 

मला कुठे तरी शेती बोलवत होती. कारण लहानपणापासून मी शेतात जात होती. शेतीच्या सगळ्या प्रक्रिया मी पाहत होते. कॉर्पोरेट क्षेत्रात बारा वर्षे काम केल्यावर मला वाटले की आपण काही तरी वेगळं केले पाहिजे. त्याच जिद्दीने मी शेती सुरू केली. आज मी माझ्या शेतात तांदळाचे उत्पादन घेत नारळ, कलिंगड, तीळ, भुईमुगाच्या शेंगा यातून उत्पादने तयार केली जातात. मला जे यश मिळते आहे, यासाठी मला ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यात बाबा डॉ. सुधीर निरगुडकर, आई चारुशीला निरगुडकर, पती डॉ. अखिल राव, भाऊ मंदार निरगुडकर यांचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेतकरीशेती