मुंबई : भायखळा करागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी अखेर मंगळवारी गुन्हे शाखेने किल्ला कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले असून त्यात जेलर मनीषा पोखरकर हिच्यासह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जणांवर हत्या, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवले आहेत.अवघ्या दोन अंडी आणि पाच पावाच्या हिशोबावरून वाद घालत जेलर मनीषा पोखरकर हिच्यासह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे पाच महिला शिपायांनी २३ जून २०१७ रोजी मंजुळाला विवस्त्र करत अमानुषपणे मारहाण केली होती. त्यातच मंजुळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने १ जुलै रोजी सहा आरोपींना अटक केली. सध्या सर्व सहा आरोपी ठाणे कारागृहात असून त्यांच्या जामीन अर्जावर ६ आॅक्टोबरला सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हे शाखेने किल्ला कोर्टातील ३७ व्या न्यायालयात ६१९ पानी आरोपपत्र सादर केले.या आरोपपत्रात सहाही आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मंजुळाला झालेल्या मारहाणीपासून ते गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यापर्यंतचा सर्व तपास, पुरावे आणि साक्षीदार तपासण्यात आले आहेत.कारागृहातील सीसीटिव्ही फुटेजसह अनेक महत्त्वाचे पुरावे यात आहेत. मात्र मंजुळाला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी गुन्हे शाखेला सापडलेली नाही. या काठीचे गूढ कायम असून ती नष्ट करण्यात आल्याचे गुन्हे शाखेने आरोपपत्रात नमूद केले. त्यामुळे अटक आरोपींविरुद्ध पुरावा नष्ट केल्याच्या कलमाचीही भर घालण्यात आली आहे. मात्र आरोपींनी काठीचे काय केले, याबाबत त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. तसेच मंजुळावर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचाही उल्लेख आरोपपत्रात केला आहे.१८२ जणांच्या जबाबांचा समावेशगुन्ह्यातील फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार मरियम शेख हिच्यासह कलम १६४ अन्वये न्यायालयासमोर नोंदविलेल्या पाच विदेशी महिला कैदी, शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तुरुंगात असलेल्या वैशाली मुदळेसह अन्य तुरुंगातील ९० साक्षीदारांसह १८२ जणांचा जबाबांचा आरोपपत्रात समावेश आहे.
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण: सहा जणांवर आरोपपत्र दाखल; हत्या, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करण्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:01 AM