मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, तीन आठवड्यांत दोषारोपपत्र दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:48 AM2017-09-02T05:48:12+5:302017-09-02T05:48:28+5:30
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण करून तीन आठवड्यांत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण करून तीन आठवड्यांत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या तपास अहवालावर उच्च न्यायालयाने समाधानही व्यक्त केले.
कारागृह अधिकाºयांनी केलेल्या अनन्वित छळामुळे मंजुळा शेट्येचा कारागृहातच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
२३ जून रोजी पोलिसांनी मंजुळा शेट्येचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली. मात्र दुसºया दिवशी अन्य एका कैदीने कारागृह अधिकाºयांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तिने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सहा महिला पोलिसांना अटक केली. गुरुवारी गुन्हे अन्वेषण विभागातर्फे अॅड. राजीव पाटील यांनी न्यायालयात सीलबंद तपास अहवाल सादर केला. तपास योग्य प्रकारे करण्यात आला असून, संबंधित लोकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती पाटील यांनी न्यायालयाला दिली.
‘लवकरच तपास पूर्ण होईल आणि आरोपींवर २० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच शेट्येचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने कायद्यानुसार दंडाधिकाºयांनीही या प्रकरणी स्वतंत्र चौकशी केली आहे,’ अशी माहिती पाटील यांनी न्यायालयाला दिली.
मंजुळा शेट्येला मारहाण केल्याने तिचा मृत्यू होऊनसुद्धा डॉ. विश्वास रोटे यांनी मंजुळाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देताना तिच्या शरीरावर एकही जखम नसल्याची खोटी माहिती दिली. त्यांनी अशी खोटी माहिती का दिली? याचा तपास करण्यासाठीही चौकशी समिती नियुक्त केल्याचे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.