मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण: प्रभारी कारागृह अधीक्षक घरबुडवे आणि इंदलकर यांचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 06:26 PM2017-08-01T18:26:49+5:302017-08-01T19:13:20+5:30
मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई, दि. 01 - मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे आणि इंदलकर यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे.
भायखळा येथील जिल्हा कारागृहात मंजुळा शेट्ये या कैद्याला कारागृह अधीक्षक आणि महिला पोलीस कर्मचा-यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी तसेच दोषी अधिका-यांवर कारवाईचीही मागणी शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी सभागृहात केली होती. त्यावर आज सरकारच्यावतीने उत्तर देण्यात आले.
याचबरोबर भविष्यात अशा घटना व एकंदर व्यवस्थेवर निगराणी ठेवण्याच्या हेतूने याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहांच्या कार्यपद्धतीवर देखरेख करण्यासाठी आमदारांची समितीची स्थापना करण्याचे आश्वासन आज सभागृहात देण्यात आले.
निलम गो-हे यांनी विशाखा समित्यांची स्थापना, स्वाती साठेंची चौकशी, तपास करणा-या पोलिस अधिका-यांची मध्येच इतरत्र बदली होणार नाही, याकडे सरकारचे लक्ष असावे अशी मागणी केली. आज कारागृहात विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्वाती साठेंनी सोशल मिडियावरून केलेल्या काही अपप्रकारांबाबत येत्या १५ दिवसांत चौकशी करून माहिती दिली जाईल, अशी माहिती आज राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपूर्वी मंजुळा शेट्ये यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या, असा खोटा अहवाल जे जे. रुग्णालयातील कॅज्युलिटी विभागाच्या डॉक्टरने दिला होता, त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. ती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मान्य केली. यानंतर शनिवारी याप्रकरणी जे.जे. रुग्णालयामधील एका डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करून कारागृहातील अधीक्षक व अन्य महिला कर्मचा-यांनी शेट्ये हिला मारहाण केली. या बेदम मारहाणीतच तिचा मृत्यू झाला होता.