समीर कर्णुक, मुंबईइराकमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये चार मुंबईकरांचा समावेश असून, यातील दोघे चेंबूर आणि दोघे मानखुर्द येथील आहेत. तब्बल वीस दिवसांपासून मायदेशात परतण्यासाठी त्या चारही जणांची धडपड सुरू असून, केवळ कंपनीने त्यांचे पासपोर्ट जप्त केल्याने त्यांचे परतीचे मार्ग बंद झाल्याची खंत त्यांच्या कुटुंबांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.मानखुर्दमधील लल्लूभाई कम्पाउंड येथील परिसरात राहणारे राजा चव्हाण आणि दिलीप चव्हाण दोन वर्षांपूर्वी मुंबईतच एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीत काम करत होते. मात्र येथे त्यांना केवळ सहा ते सात हजार रुपये वेतन मिळत असल्याने त्यांनी एका एजन्सीच्या माध्यमातून इराकमध्ये नोकरी शोधली आणि ते इराकमध्ये वास्तव्यास गेले. शिवाय २०१२ साली एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून २८ भारतीय नोकरीनिमित्त इराकला गेले होते. त्यात चेंबूरच्या घाटले गावात राहणाऱ्या जगदीश मोरे आाणि गोरखनाथ जगताप यांचाही समावेश होता. जानेवारी २०१४ मध्ये चारही जणांचा दोन वर्षांचा नोकरीचा करार संपल्याने ते पुन्हा मायदेशी परतले. त्यानंतर पुन्हा मे महिन्यात चौघे इराकमध्ये दाखल होत कामावर रुजू झाले. मात्र दरम्यानच्या काळात येथे दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आणि येथे नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेल्या भारतीयांना त्याच्या झळा पोहोचल्या.दिलीप आणि राजा चव्हाण व त्यांचे सहकारी राहत असलेल्या परिसरात दररोज बॉम्बस्फोट, गोळीबार होत आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे चौघेजण जीव मुठीत घेऊन तेथे राहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने पासपोर्ट आणि तिकिटाचे पैसे देऊन मायदेशी धाडावे, अशी मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे. मात्र कंपनीकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. यावर त्यांनी तेथेच काम बंद आंदोलनही करून पाहिले. परंतु पासपोर्ट हाती मिळत नसल्याने अद्याप ते तेथील एका हॉटेलमध्ये राहत आहेत, अशी माहिती त्यांनीच आपल्या कुटुंंबीयांना दूरध्वनीवरून देत आमच्या सुटकेसाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी हाक दिली आहे.
नोकरीसाठी गेलेले मानखुर्द, चेंबूरचे चौघे इराकमध्ये अडकले!
By admin | Published: July 29, 2014 1:17 AM