अठरा तासांपासून मानखुर्द अंधारात
By admin | Published: April 16, 2017 03:24 AM2017-04-16T03:24:28+5:302017-04-16T03:24:28+5:30
मानखुर्दमधील जयहिंद नगर, सोनापूर, ज्योतिर्लिंग नगर, आंबेडकर नगर, साठे नगर, पीएमजीपी कॉलनी, जनकल्याण सोसायटी, मोहिते पाटील नगर, म्हाडा वसाहत
मुंबई : मानखुर्दमधील जयहिंद नगर, सोनापूर, ज्योतिर्लिंग नगर, आंबेडकर नगर, साठे नगर, पीएमजीपी कॉलनी, जनकल्याण सोसायटी, मोहिते पाटील नगर, म्हाडा वसाहत या भागांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक रहिवाशांनी रात्र घराबाहेरच काढली. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.
मुंबईच्या उपनगरात रिलायन्स आणि टाटाकडून वीजपुरवठा केला जातो. मानखुर्दमध्ये रिलायन्ससह टाटाचे ग्राहक असून, येथील टाटाच्या ग्राहकांना रिलायन्सच्या नेटवर्कवरून वीजपुरवठा केला जातो. शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास हाय टेन्शन केबलमध्ये झालेल्या बिघाडामुळे मानखुर्द येथील रिलायन्ससह टाटाच्या वीज ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले. शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा शनिवारी सकाळी ८ वाजता पूर्ववत झाला. मात्र पुन्हा दोन तासांनी वीज प्रवाह खंडित झाला. त्यानंतर सहा तासांनी पुन्हा दुपारी २ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर दुपारी साडेतीनला वीजपुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान स्थानिकांनी ग्राहक सेवा केंद्राला वारंवार याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्सच्या नेटवर्कमध्ये झालेल्या समस्येमुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि याचा फटका टाटासह रिलायन्सच्या ग्राहकांनाही बसला. (प्रतिनिधी)