मानखुर्द प्रभाग-१४१ पोटनिवडणुकीत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 02:08 AM2020-01-09T02:08:23+5:302020-01-09T02:08:46+5:30
मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे.
मुंबई : मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी असूनही या प्रभागात शिवसेना, भाजप, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसह सुमारे १८ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेची ही जागा खेचून आणण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. चुरशीच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वॉर्ड क्रमांक १४१मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. यासाठी ९ जानेवारी म्हणजे उद्या मतदान होत असून, १० तारखेला निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन आणि समाजवादीचे खान जमिर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. हा प्रभाग शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असून, लोकरे त्यांच्या मर्जीतील उमेदवार आहेत. ख़ासदार मनोज कोटक यांचाही लोकसभा मतदारसंघ याच परिसरातून जातो. कोटक हे पालिकेतील भाजपचे गटनेते असल्याने सेनेकडून ही जागा खेचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ पालिका पोटनिवडणुकीतही पराभव झाल्यास त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, रिपब्लिकन सेनेचे संबोधी कांबळे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अमोल क्षीरसागर आणि ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निवडणुकीसाठी
यंत्रणा सज्ज
मतदार - पुरुष - १८ हजार ५४
महिला - १४ हजार ३२
एकूण मतदार - ३२ हजार ९६
बुथ - २८, बुथ क्रमांक १०मध्ये सर्वांत कमी ५१६ मतदार आहेत. तर बुथ क्रमांक १८मध्ये सर्वांत जास्त १३९८ मतदार आहेत.
९ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे. तर १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, अवघ्या एका तासातच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.