मानखुर्द-गोवंडी येथे नागरिकांनी वाहिली शौचालयांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:02 AM2019-11-15T02:02:59+5:302019-11-15T02:03:06+5:30
पूर्व उपनगरातील एम पूर्व वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या मानखुर्द व गोवंडी परिसरातील अनेक शौचालयांची दुरवस्था झाली आहे.
मुंबई : पूर्व उपनगरातील एम पूर्व वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या मानखुर्द व गोवंडी परिसरातील अनेक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. येथील नागरिकांनी एका संस्थेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे. दुरवस्था झालेल्या तसेच वषार्नुवर्षे पुनर्बांधणी न झालेल्या शौचालयांना येथील स्थानिक नागरिक राइट टू पी अंतर्गत श्रद्धांजली वाहतात. या मोहिमेअंतर्गत रोज संध्याकाळी एकत्र येत शौचालयांसमोर मेणबत्त्या पेटवून शोकसभेचे आयोजन करण्यात येते. ११ नोव्हेंबर रोजी या आंदोलनाची सुरुवात झाली असून १९ नोव्हेंबर म्हणजेच जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी या आंदोलनाचा समारोप होणार आहे.
एम पूर्व वॉर्ड अंतर्गत येणाºया गोवंडी, शिवाजी नगर, देवनार, मानखुर्द व ट्रॉम्बे या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. येथे नागरिकांना शौचालयांची कमतरता भासते. मंडाळे, पायली पाडा, आंबेडकर नगर, महाराष्ट्र नगर, रफिक नगर, निरंकारी नगर, वाशीनाका या परिसरांमधील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने रहिवाशांना घाणेरड्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या शौचालयांमध्ये नैसर्गिक विधीसाठी जावे लागते. अनेकदा लहान मुले तुटलेल्या शौचालयामध्ये पडून जखमी होण्याच्या घटना देखील घडत आहेत. काही शौचालयांच्या खिडक्या व दरवाजे तुटलेले असल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मंडाळे येथे काही महिन्यांपूर्वी शौचालायत पडून तिघांचा मृत्यू झाला होता. या सर्व समस्यांकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिकांनी शौचालयांच्या शोकसभेचे आयोजन केले आहे.
आमचे प्रिय शौचालय ज्याने आम्हाला प्रत्येक वेळी साथ दिली ते आज आमच्यात राहिले नाही, अशा आशयाचे फलक हातात घेऊन नागरिक शौचालयांना श्रद्धांजली वाहत आहेत. नागरिकांना दररोज पाच रुपये देऊन शौचास जाणे परवडत नाही. म्हणूनच नागरिक धोका पत्करून दुरवस्था झालेल्या शौचालयांमध्ये जातात. महानगरपालिकेने येथे त्वरित शौचालयांची पुनर्बांधणी करावी असे राइट टू पी च्या कार्यकर्त्यांचे मत आहे.