मुंबई : मेट्रो दोन आणि दोन ब मार्गिकेसाठी उभारल्या जाणा-या मानखुर्द कारशेडचे काम गेले आठ महिने बंद आहे. या कामासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, एमएमआरडीएने या कामासाठी ४६४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असताना त्यासाठी लघुत्तम बोली ५४३ कोटी रुपयांची लावण्यात आली आहे. १७ टक्के जास्त रकमेची ही बोली स्वीकारली जाणार की नाही याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे रखडलेल्या डी. एन. नगर ते मानखूर्द या मार्गावरील मेट्रो दोन बच्या कामात विघ्न निर्माण झाले आहे. या मार्गिकेच्या तीन टप्प्यातल्या कामात दिरंगाई करणा-या कंत्राटदारांना फेब्रुवारी महिन्यांत बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यानंतर रखडलेले ९३ टक्के काम मार्गी लावण्यासाठी नवा कंत्राटदार नियुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात डी एन नगर ते एमटीएनएलपर्यंतच्या पँकेज सी -१०१ (१०५८.७१ कोटी), एमटीएनएल ते डायमंड गार्डन, चेंबुरपर्यंतच्या पँकेज सी -१०२ (४७४ कोटी) आणि मानखुर्द डेपो पँकेज सी- १०३ (४६४ कोटी) या कामांचा समावेश आहे.
या पैकी मानखूर्द डेपोच्या कामासाठीचे वित्तीय देकार नुकतेच उघडण्यात आले असून त्यात तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी आलूवालिया काँन्ट्रँक्टर यांची बोली लघूत्तम (५४३.२८ कोटी) आहे. मात्र, ती ती मुळ अंदाजपत्रकापेक्षा ७८ कोटींनी जास्त आहे. निविदेतला दर मान्य करून या कंत्राटदाराला काम देणे, कंत्राटदाराशी वाटाघाटी करून दर कमी करण्याचा प्रयत्न करणे किंवा ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने प्रक्रिया ककरणे हे तीन पर्याय प्राधिकरणाकडे आहेत. ८ कोचच्या ७२ मेट्रो ट्रेनची क्षमता असलेले हे कारशेड डबल डेकर स्वरुपाचे असेल. १५ वर्कशाँप लाईनसह तिथे कर्मचा-यांसाठी निवासस्थानेसुध्दा उभारली जाणार आहेत.
अन्य दोन कामांची प्रतीक्षा कायम : मेट्रो दोन ब च्या तीन कामांसाठी काढलेल्या सुधारीत निविदांपैकी दोन निविदा आँगस्ट महिन्यात पुन्हा रद्द करण्यात आल्या होत्या., त्यानंतर या मार्गिकेवरील तीन आयकाँनीक पुलांचा समावेश करून सुधारीत निविदा काढण्यात आल्या असून त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. त्या कामांसाठी १५३२ कोटी रुपये खर्च होतील असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या खर्चात किती वाढ झाली हे सांगता येईल असे एमएमआरडीएच्या अधिका-यांनी सांगितले.