मानखुर्द, गोवंडीचे नाले गाळातच; सफाईसाठी २२६ कोटींचा निधी, महिन्याभरात होणार का स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:19 AM2023-05-03T10:19:05+5:302023-05-03T10:19:18+5:30
मुंबईचा आकार बशीसारखा पसरट असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबते.
रतींद्र नाईक
मुंबई : देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेने यंदा पावसात मुंबई तुंबू नये म्हणून मार्च महिन्यापासूनच नालेसफाईला सुरुवात केली आहे. ३१ मे पर्यंत ९ लाख ८२ हजार ४२६ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने डोळ्यासमोर ठेवले असून, ५६.८९ टक्के गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे. असे असले तरी मानखुर्द, गोवंडी, टिळक नगर येथील नाले अजून तुंबलेलेच आहेत. मिठी नदीही स्वच्छ होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पालिकेने या नालेसफाईसाठी २२६ कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईचा आकार बशीसारखा पसरट असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबते. अशी स्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाकडून दरवर्षी लहान गटारे, नाल्यांची स्वच्छता केली जाते. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाल्यातील गाळ अनेकदा तसाच राहतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याचे नियाेजन पालिकेने केले आहे.
हे नाले साफ पण...
मुलुंड येथील लोक एव्हरेस्ट सोसायटी, एसीसी नाला, बाऊंडरी नाला पालिकेकडून साफ करण्यात आला. तर, कुर्ल्यातील ए टी आय नाला, सायन येथील डब्लू टी टी नाला, अँटॉप हिल येथील दिन बंधू नाला, मानखुर्द पीएमजीपी, महाराष्ट्र नगर येथील लहान गटारे, चेंबूरच्या माहुल नाल्याच्या सफाईचे काम करण्यात आले. मात्र, लोकवस्ती असलेल्या भागात या नाल्यातील गाळ तसाच आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी मुंबईतल्या सर्व नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण केली जातील. - पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त