रक्तदानाच्या महायज्ञाला मानखुर्दकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:06+5:302021-07-05T04:06:06+5:30
मुंबई : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं’ या रक्तदानाच्या ...
मुंबई : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं’ या रक्तदानाच्या महायज्ञाला मानखुर्दकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भाजपचे वार्ड अध्यक्ष महेश काशिद यांनी मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनी येथील दत्त मंदिर येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी असे मिळून एकूण १७ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असा संदेश दिला.
कोरोनाच्या महामारीने मार्च, २०२० पासून सर्वत्र कहर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी रक्ताचा मोठा तुटवडा भासला होता. आता लवकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरिकांनी या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन या शिबिराच्या वेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. या शिबिरात तरुणांपासून ज्येष्ठ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
... यांनी केले रक्तदान
या शिबिरात दीपक गुप्ता, गीतेश पाटील, रोशन तांबे, प्रकाश घोरपडे, बाळू चव्हाण, अरविंद गवारे, गणेश माथे, चेतन शिलवंत, सचिन चव्हाण, हरीकेश यादव, प्रमोद अवघडे, मनीष राठोड, विकास साठे, संदीप देसाई, विकास गोटे, महेश काशिद, सिद्धनाथ रूपनर आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.