मानखुर्दवासीयांची बिकट वाट!

By admin | Published: June 17, 2017 02:19 AM2017-06-17T02:19:13+5:302017-06-17T02:19:13+5:30

देश प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या दाव्याचे तीनतेरा वाजले आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात रहिवाशांना घरी

Mankhurd's hardest wait! | मानखुर्दवासीयांची बिकट वाट!

मानखुर्दवासीयांची बिकट वाट!

Next

- समीर कर्णुक । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देश प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या दाव्याचे तीनतेरा वाजले आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात रहिवाशांना घरी जाण्यासाठी नाल्यातून वाट काढावी लागत आहे. मानखुर्दमध्ये सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे.
मानखुर्दच्या साठेनगर येथील रहिवाशांना पीएमजीपी वसाहत किंवा मानखुर्द रेल्वे स्थानकाकडे ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी एखादा पादचारी पूल तयार करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशी करत आहेत. मात्र, महापालिका आणि स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने, रहिवाशांनीच दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाकडाचे दोन पूल बांधले. त्यामुळे नागरिकांना नाला ओलांडून जाणे सोपे झाले होते.
मात्र, मान्सूनपूर्व नालेसफाईच्या वेळी हे दोन्ही पूल पालिकेकडून पाडण्यात आले. नाल्यावर पूल बांधण्यात उदासीन असलेल्या महापालिका प्रशासनाने लाकडी पूल तोडण्याची तत्परता दाखविल्याने, रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नालेसफाईला या पुलांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचा महापालिकेचा युक्तिवाद होता. मात्र, महापालिकेच्या या कारवाईमुळे रहिवाशांना पुन्हा एकदा पीएमजीपी वसाहत आणि मानखुर्द रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. दोन मिनिटांच्या अंतरासाठी १५ मिनिटे वाया जात असल्याने, सध्या येथील रहिवाशांकडून जीव धोक्यात घालून नाल्यातूनच घरी जाण्याची जोखीम पत्करली जात आहे. लहान शाळकरी मुलेदेखील याच नाल्यातून शाळेत जाताना दिसत आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यावर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
याबाबत महापालिकेच्या एम पूर्व प्रभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Mankhurd's hardest wait!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.