मुंबईकरांनो, झाडाखालून जाताना सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:30 AM2018-07-25T04:30:10+5:302018-07-25T04:30:34+5:30

पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

Mankind, beware of going under the tree! | मुंबईकरांनो, झाडाखालून जाताना सावधान!

मुंबईकरांनो, झाडाखालून जाताना सावधान!

googlenewsNext

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, झाड कोसळण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे, गेल्या काही महिन्यांतील घटनांतून समोर आले आहे. दहिसरमध्ये १४ वर्षीय मुलीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवार, २४ जुलै रोजी मुलुंडमध्ये भरधाव रिक्षावर फांदी कोसळल्याने रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर चालकासह दोघे जखमी झाले. रवी शहा (३१) असे मृत प्रवाशाचे नाव असून, उर्वी शहा आणि चंद्रभान गुप्ता (चालक) अशी जखमींची नावे आहेत. त्यामुळेच मुंबईकरांनी झाडांखालून जाताना सावध राहणे गरजेचे आहे.
मुलुंड कॉलनी परिसरातील गुरुगोविंद सिंग रोडवर मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील रस्त्यावरून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना, अचानक रस्त्यालगत असणाऱ्या झाडाची फांदी तुटून या रिक्षावर कोसळली. मुलुंड येथील दुर्घटनेची महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तीन जखमींना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
जखमींवर अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू असून, रिक्षाचालक गंभीर आहे, तर उर्वी शहा यांच्या डोक्याला मार लागला आहे. पाऊस सुरू होताच झाड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पादचाºयांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, दादर येथे १० जूनला झाड कोसळून चारजण जखमी झाले होते तर मालाड पश्चिम येथे २५ जूनला एरंगळ येथील बस स्टॉपजवळ दीडशे वर्षे जुने वडाचे झाड कोसळले होते.

एकूण झाडे किती?
वृक्षगणनेनुसार मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत.
यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत, तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत.
या व्यतिरिक्त एक लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित एक लाख एक हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

पाच वर्षांत १८ जणांचा मृत्यू
गेल्या पाच वर्षांत मुंबईत झाड पडून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी अशा दुर्घटनांमध्ये चौघांना जीव गमावावा लागला होता, तर गेल्या तीन महिन्यांत झाड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ पिंपळाचे झाड पडून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला.

...म्हणूनच कोसळतात झाडे
मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प व बांधकामांमुळे बहुतांशी झाडांची मुळे कमकुवत झालेली आहेत. अतिशय जीर्ण झालेली झाडे, झाडाच्या बुंध्याजवळ काँक्रिटीकरण, बेकायदा खोदकाम, पाइप लाइन, वीज केबल आदी टाकताना मुळांना होणारी इजा, झाडांचे आयुष्य शोधण्यासाठी आधुनिक साधनांचा अभाव, तसेच झाडांच्या फांद्यांची अयोग्य पद्धतीने करण्यात येणारी छाटणी, यामुळे झाडे मुळापासून उन्मळून पडतात.

काही महत्त्वाच्या दुर्घटना
- ७ जून २०१७ - कुलाबा, नेव्हीनगर येथे अंगावर झाड पडून राहुल नावाच्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू.
- २२ जुलै २०१७ - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा चेंबूर येथे मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचे झाड कोसळून मृत्यू.
- ७ डिसेंबर २०१७ - चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून श्रद्धा घोडेवार या महिलेचा
जागीच मृत्यू.
- १९ एप्रिल २०१८- दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू.
- २९ मे २०१८ - वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून लीला सुखी या 91 वर्षीय वृद्धेचा मृत्यू.
- ९ जून २०१८- दहिसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंग्रा या 13 वर्षीय मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू.

Web Title: Mankind, beware of going under the tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई