कोरोनाच्या लढाईत माणूसकी मेली, भर-रस्त्यात दीड तास तो तडफडत होता 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:48 PM2020-05-08T14:48:53+5:302020-05-08T14:49:11+5:30

अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेला एक तरुण संध्याकाळी सहा वाजल्यापासून टेंभी नाक्यावरील वाडिया रुग्णालयाजवळ अस्वस्थ अवस्थेत बसला होता. मला जवळच्या रुग्णालयात दाखल करा अशी विनवणी तो करत होता

Mankind died in the battle of Corona, he was tormented for an hour and a half on the road mumbai MMG | कोरोनाच्या लढाईत माणूसकी मेली, भर-रस्त्यात दीड तास तो तडफडत होता 

कोरोनाच्या लढाईत माणूसकी मेली, भर-रस्त्यात दीड तास तो तडफडत होता 

Next

संदीप शिंदे  

मुंबई : भर रस्त्यात तो कोसळला. वेदनांनी विव्हळत होता. तडफडत होता. सतत उलट्या सुरू होत्या. दर दहा मिनिटांनी तो पाण्यासाठी टाहो फोडायचा. सभोवतालची लोकं त्याच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकायची. उठायचा प्रयत्न केल्यानंतर तो पुन्हा खाली कोसळायचा. त्याला उचलून रुग्णालयात दाखल करावे असे प्रत्येकाला वाटत होते. मात्र, कुणीही मदतीसाठी पुढे जाऊ शकत नव्हता. तब्बल दीड तासांच्या खटाटोपानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि तडफडणा-या जीवाला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने गेली. कोरोनाने माणुसकीचाही कसा गळा घोटला आहे याची प्रचिती देणारा हा दुर्देवी घटनाक्रम गुरूवारी रात्री ठाण्यातील टेंभी नाक्यावर घडला.  

अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेला एक तरुण संध्याकाळी सहा वाजल्यापासून टेंभी नाक्यावरील वाडिया रुग्णालयाजवळ अस्वस्थ अवस्थेत बसला होता. मला जवळच्या रुग्णालयात दाखल करा अशी विनवणी तो करत होता. मात्र, काही केल्या अ‍ॅम्ब्युलन्सच उपलब्ध होत नव्हती. रात्री सात वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात तो खाली कोसळला. काही जण त्याच्या मदतीला धावले. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी ती पावलं पुन्हा माघारी फिरली. ही बातमी कळताच स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे तिथे पोहचले. दोनशे मीटर अंतरावर सिव्हिल रुग्णालय आहे. या तरुणाला उचलून रुग्णालयात दाखल करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. मात्र, या तरुणाला जर कोरोनाची लागण झालेली असेल तर मदत करणा-या प्रत्येकालाच प्रादुर्भावाचा धोका होता. त्यामुळे पुन्हा अ‍ॅम्ब्युलन्ससाठी धावपळ सुरू झाली. पालिकेच्या आपत्कालीन कक्षात सतत फोन केला तरी अ‍ॅम्ब्युलन्स काही येत नव्हती. 

इकडे या तरुणाची धडपड बघून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत होता. तो सतत पाण्यासाठी याचना करत होता. त्याच्या दिशेने फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या तो गटागट संपवायचा. मध्येच उलट्या करायचा. उभा राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा. त्या प्रयत्नांत रस्त्याच्या दूभाजकांवर तो आडवा झाला. दोन मिनिटांत तिथूनही खाली कोसळल्याने सभोवतालचा प्रत्येक जण हळहळला. त्याची तडफड कुणालाही पहावत नव्हती. कोकाटे यांचीही धीर सुटत चालला होता. त्यांनी तडक ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांना फोन केला. एक तास झाला तरी पालिकेकडून अ‍ॅम्ब्युलन्स पाठवली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर या दोघांनी शेलक्या शब्दात संबंधितांची कानउघडणी केल्यानंतर १० मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स तिथे दाखल झाली. पीपीई किट घातलेल्या कर्मचा-यांनी या तरुणाला आत झोपवले आणि सायरन वाजवत ही अ‍ॅम्ब्युलन्स कळवा रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाली. हा सारा घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा होता. कोरोनाने आपल्यातली माणुसकीसुध्दा जिवंत ठेवली नसल्याचीच चर्चा नाक्यावर पुढे काही मिनिटे सुरू होती. हा तरूण गोकुळनगर भागात राहणारा असून त्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची चाचणी सुरू असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

त्याच्यातला माणूस मात्र जिवंत होता

रस्त्यावर पडलेल्या या तरुणाच्या जवळपास अनवधानाने कुणी फिरकू नये यासाठी काही लोकांना संरक्षक कडे केले होते. परंतु, त्यानंतरही रस्त्यावरून ये जा करणारी काही मंडळी थांबून विचारपूस करण्याचा प्रयत्न करत होती. त्या लोकांवर हा तरूणच ओरडायचा. माझ्याजवळ येऊ नका असे म्हणत त्यांच्या दिशेने हातातल्या बाटल्या फेकायचा. आपल्यामुळे कुणाला प्रादुर्भाव होऊ नये असा विचार करणा-या या तरुणातली माणुसकी मात्र जिवंत होती.

Web Title: Mankind died in the battle of Corona, he was tormented for an hour and a half on the road mumbai MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.