मुंबईकरांची वाट खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:41 AM2018-07-17T04:41:32+5:302018-07-17T04:41:34+5:30
मुंबई शहरासह उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात महापालिकेला अपयश आले आहे.
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. महापालिकेनेच दिलेली ४८ तासांची मुदत उलटून गेली असून, अद्यापही म्हणावे तसे खड्डे पालिकेने भरलेले नाहीत. परिणामी खड्ड्यांंमुळे मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूककोंडी वाढत आहे. सोमवारी पूर्व उपनगरात घाटकोपर येथील सर्वोदय, कुर्ला येथील कमानी, शीतल सिनेमा, कुर्ला डेपो, अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, कुर्ला पश्चिमेकडील जरीमरी, घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा, अंधेरी पूर्वेकडील मरोळ, सांताक्रुझ पश्चिमेकडील बेझंट रोड, मिलन सब-वे, वांद्रे पश्चिम येथील शर्ली राजन रोड, माटुंगा रोड पश्चिम रेल्वेसमोर सेनापती बापट मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, अंधेरी पश्चिम येथील लक्ष्मी नारायण मंदिरासमोरील विरा देसाई रोड, न्यू लिंक रोड मोर्या हाउस लॅन्ड मार्क बिल्डिंगलगतचा परिसर, पवई-साकीनाका, सायन-धारावी चौक येथील रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, या रस्त्यांसह मुंबई शहर आणि उपनगरातील मुख्य रस्त्यांसह गजबजलेल्या रस्त्यांवर पीक अवरमध्ये वाहतूककोंडी असल्याचे चित्र होते.