अत्याचार झाला, आयुष्याचं लक्तर बनलं; पण 'मनोधैर्य' योजनेनं सावरलं! किती मिळते मदत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:21 IST2024-12-17T16:18:09+5:302024-12-17T16:21:45+5:30
पीडितांना किमान २ लाख ते कमाल १० लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

अत्याचार झाला, आयुष्याचं लक्तर बनलं; पण 'मनोधैर्य' योजनेनं सावरलं! किती मिळते मदत?
राज्यात बलात्कार, अॅसिड हल्ला, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला आणि बालकांचे पुनर्वसन करता यावे, यासाठी राज्य सरकारने मनोधैर्य योजना सुरू केली असून २ ऑक्टोबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. पीडित महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणारी महिला व बाल विकास विभागाची ही महत्वाची योजना आहे. यामध्ये पीडितांना किमान २ लाख ते कमाल १० लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
पीडितांना वैद्यकीय व मानसिक आधार मिळवून देणे, समुपदेशन करणे, कायदेशीर सल्ला देणे, त्यांना नोकरी व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कुठे करावा अर्ज?
- संबंधित क्षेत्रातील महिला व बालविकास विभाग कार्यालयात यावे.
- मनोधैर्य योजनेचा अर्ज घेऊन तो काळजीपूर्वक वाचावा.
- अर्जातील विचारलेली सर्व माहिती अचूक भरुन आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
- भरलेला अर्ज त्याच कार्यालयातील विभागात जमा करावा.
- अर्ज व सोबत जोडलेल्या कागदपत्र तपासणीनंतर लाभ दिला जातो.
योजनेच्या अटी व शती
- राज्यातील पीडितांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
- पीडितांना गृह किंवा अन्य विभागांमार्फत असणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नाही.
- पीडित महिला व बालकाचे स्वत:चे बँक खाते असणे आवश्यक.
- पीडित सज्ञान नसल्यास पालकांच्या नावे बँक खाते गरजेचे.
- पीडिताने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अनिवार्य आहे.