मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन राज यांनी मनोहर पर्रीकर या नेत्यापलिकडील व्यक्तीमत्त्वाचं वर्णन केलं आहे. गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. त्यानंतर सर्वच राजकीय दिग्गजांकडून पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही पर्रीकरांना फेसबुकवरुन श्रद्धाजली वाहिली आहे.
उमदा, उच्चशिक्षित, सर्वसमावेशक आणि अत्यंत सालस अश्या राजनेत्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, आणि सध्याच्या काळात तर ह्या आरोपांचा स्तर दिवसेंदिवस घसरत असताना, मनोहर पर्रीकरांचं चारित्र्य आणि कर्तृत्वच इतकं उत्तुंग होतं की विरोधक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा विचार स्वप्नात देखील करू शकले नसते.अहंगंडाने भरलेल्या आणि व्यक्तिस्तोमाने बजबजलेल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात मनोहर पर्रीकरांच्या निधनाने निर्माण होणारी पोकळी खरंच भरून निघणं कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनोहर पर्रीकरांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली, अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुक आणि ट्विटरवरुन टाकताना पर्रीकरांसोबतचा आपला फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, देशातील दिग्गज राजकारण्यांकडून पर्रीकरांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून सोशल मीडियाही भावूक झाल्याचं पाहायला मिळतं.